वडापाव विकायचाय, मग तुम्ही परीक्षा पास केली का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 03:01 PM2024-09-20T15:01:56+5:302024-09-20T15:03:09+5:30

कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन : भेसळ रोखण्यासाठी अन्न विभागाची मोहीम

Want to sell vadapav, then did you pass the exam? | वडापाव विकायचाय, मग तुम्ही परीक्षा पास केली का ?

Want to sell vadapav, then did you pass the exam?

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक जण स्वयंरोजगार उभारतात. हा स्वयंरोजगार खाद्यपदार्थाशी संबंधित असतो. गावखेडे असोत किंवा मोठी शहरे या ठिकाणी चौकांमध्ये, रस्त्यालगत चहा, वडापाव व अन्य खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या दिसतात; परंतु आता अशा पद्धतीने व्यवसाय करता येणार नाही. विविध खाद्यपदार्थ तयार करून विक्री करायची झाली, तर त्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे झाले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र यासाठी ५० गुणांची परीक्षा द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.


केंद्र सरकारच्या भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने खाद्यपदार्थ तयार करणे व हाताळणी करणाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यासंदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये हॉटेलमालक, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली जात आहे. कार्यशाळेनंतर उपस्थित प्रतिनिधींची त्याच ठिकाणी परीक्षा घेतली जाते किंवा एखादा दिवस निश्चित केला जातो. अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्यासाठी दिवस निश्चित केला जातो. 


जिल्ह्यात अन्न विभागातर्फे कार्यशाळा घेऊन हॉटेल विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात त्यांना अन्न पदार्थ हाताळणे, स्टोअर करणे, नाशवंत पदार्थ साठवणूक करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेनंतर संबंधितांना प्रमाणपत्र वाटप केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत परीक्षा घेतलेली नाही. 


दूध विकणाऱ्यांची घेणार का परीक्षा? 
जिल्ह्यात शासकीय दूध संकलन करणाऱ्या संस्था नाहीत. खुल्या पद्धतीने दुधाची विक्री घरोघरी केली जाते किंवा ज्या प्रकल्पांमध्ये दूध हाताळणी होते, तेथील कर्मचारी किंवा मालकांची परीक्षा घेणार काय, असा प्रश्न आहे.


कोणाला ही परीक्षा द्यावी लागणार? 
हॉटेलचालक- मालक, कुक, आईस्क्रीम गाडीचा चालक-मालक, वडापाव गाडीचालक, चहाची टपरीचालक, घरपोच भोजन पुरवठा करणारे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, केक-खवा तयार करणारे व्यावसायिक यासह सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांना आता हे प्रशिक्षण आणि परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे.


पास नाही तोपर्यंत द्यावी लागते परीक्षा 
परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुन्हा परीक्षा देण्याची सुविधा आहे. जोपर्यंत तो व्यावसायिक या परीक्षेत पास होणार नाही, तोपर्यंत त्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे, असा नियम आहे. जिल्ह्यात याबाबत अजूनपर्यंत पत्र प्राप्त झालेले नाही.


"जिल्ह्यातील खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेलचालक- मालक तसेच बेकरीचालक व अन्य पदार्थ विक्रेत्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्यात अजूनपर्यंत परीक्षा घेण्यात आलेली नाही."
- सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी

Web Title: Want to sell vadapav, then did you pass the exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.