ओबीसी युवकांना व्यवसायासाठी मिळणार कर्ज ! ओबीसी महामंडळ करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:39 IST2024-12-18T15:38:53+5:302024-12-18T15:39:45+5:30
युवकांना स्वयंरोजगाराची संधी : बिनव्याजी कर्ज योजनेची सोय

Want to start a business? OBC Corporation will help with loans
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा युवक- युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उद्योग सुरु करण्यासाठी १ लाखाचे बिन व्याजी थेट कर्ज योजना सुरु केली आहे. १. सदर योजनेत नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना चार टक्के व्याज आकारण्यात येईल. कर्ज परतफेडीची मुदत ४ वर्ष असणार आहे.
२० टक्के बिजभांडवल योजनेंतर्गत पाच लाख रूपयांचे कर्ज दिले जाते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजुर कर्ज रक्कमेच्या पाच टक्के लाभार्थी, २० टक्के महामंडळ व ७५ टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर सहा टक्के व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याज दर लागु लागु राहील. कर्जाची परतफेड पाच वर्षात करायची आहे.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १० लाखांपर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केले जाते. अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम महामंडळ देईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बैंक निकषानुसार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथील ओबीसी महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा.
बचत गटाला उद्योगासाठी मिळणार कर्ज
- गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १० ते ५० लाखापर्यंत कर्ज दिले जाते. बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत) अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बैंक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल.
- नॉन क्रिमीलेअर उमेदवारांच्या गटांकरीता ही सवलत असणार आहे. मंजुर कर्जावर पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रूपये मयदित एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.