सांडपाणी व इतर बांधकाम सदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:21 PM2017-11-18T23:21:41+5:302017-11-18T23:21:59+5:30
शहराच्या इंदिरा गांधी चौक परिसरात १०० खाटांच्या महिला व बाल रूग्णालयाची इमारत उभी झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : शहराच्या इंदिरा गांधी चौक परिसरात १०० खाटांच्या महिला व बाल रूग्णालयाची इमारत उभी झाली आहे. सदर रूग्णालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र रूग्णालयातील सांडपाण्याची विल्हेवाट योग्यरितीने करण्यात आली नाही. शिवाय इतर बांधकाम चुकीच्या पध्दतीने केल्याने मुंबई आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन जाधव यांनी या बांधकामावर आक्षेप घेतला आहे.
सन २०११-१२ मध्ये गडचिरोली शहरात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालय निर्माण करण्यास शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. त्यानुसार इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून या इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, पथदिवे, पाण्याची व्यवस्था आदी कामे योग्यरितीने करण्यात आली नाही. सहा महिन्यापूर्वी ही कामे नव्याने करण्याची सूचना सहसंचालक डॉ. मोहन जाधव यांनी केली होती. त्यानंतर डॉ. जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रूग्णालयातील भौतिक सोयीसुविधांची पाहणी गुरूवारी केली. मात्र आपण सूचना केल्यानंतरही कामात सुधारणा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चुकीच्या पध्दतीने काम झाल्यामुळे डॉ. जाधव यांनी संबंधित यंत्रणेप्रती नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.