७४ कोटी रूपयातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 09:53 PM2019-06-02T21:53:05+5:302019-06-02T21:54:07+5:30
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने सदर व्यवसाय तोट्याचा ठरत चालला आहे. धानाच्या शेतीसाठी अगदी सुरूवातीपासून सिंचनाची गरज असते मात्र मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. तलाव, बोड्यांच्या माध्यमातून सिंचन केले जाते. मात्र दिवसेंदिवस या साधनांची पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे. त्यांचे खोलीकरण करणे गरजेचे झाले आहे. तलाव, बोड्यांचे खोलीकरण झाल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होते तसेच भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत होते. या दोन्ही उद्देशानेच शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम सुरू केला आहे.
जलयुक्त शिवार अभियानची कामे विविध विभागांच्या मार्फतीने केली जातात. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग, पंचायत समिती, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विभागांना निधी उपलब्ध करून देऊन काम पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने जलयुक्त शिवारची कामे करण्यास मोठा वाव आहे.
मुख्यमंत्र्यांनीही गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामे प्रगतीपथावर आहेत. २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवारच्या कामांवर सुमारे ७४ कोटी ४२ लाख रूपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. या निधीतून सुमारे ४ हजार ५१९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभागाने २ हजार २२८ कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी २४ कोटी रूपये खर्च येणार आहे. पंचायत समिती विभागाने २५० कामे मंजूर केली आहेत. त्यावर तीन कोटी रूपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने ७२ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ११ कोटी ५७ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंधारण विभागाने ४२ कामे मंजूर केली. त्यावर ८ कोटी ७३ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंपदा विभागाने केवळ ३ कामे मंजूर केली. त्यावर ८२ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. वनविभागाने १ हजार ९२४ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ४५ कोटी १९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.
कामे पूर्ण करा
शासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी खर्च केला जात नाही. ही गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य अडचण आहे. कामे सुरू करून ती पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.