खड्ड्यातील पाण्यावर भागवावी लागते तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:43 PM2019-06-27T22:43:41+5:302019-06-27T22:44:03+5:30
अहेरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुभाषनगर या १५ घरांच्या गावाला खड्ड्यामधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील गढूळ पाण्यामुळे विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव खुर्द : अहेरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या सुभाषनगर या १५ घरांच्या गावाला खड्ड्यामधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. खड्ड्यातील गढूळ पाण्यामुळे विविध आजारांनाही बळी पडावे लागत आहे.
गावामध्ये विहीर किंवा हातपंप खोदून द्यावे, यासाठी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र या गावात विहीर खोदण्यात आली नाही. गावात पाण्याचे साधन उपलब्ध नसल्याने गावाजवळ असलेल्या एका खड्ड्यातील पाणी भरावे लागते. पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये उतरल्यानंतर सदर पाणी दूषित होते. तेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागते.
कच्च्या विहिरीसारख्या दिसणाऱ्या सदर खड्ड्यातून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांनी काठावर आडवे लाकडे टाकली आहेत. या लाकडांवर उभे राहून पाणी काढावे लागते. एखाद्या व्यक्तीचा तोल गेल्यास जीवाला मुकावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गावात विहीर खोदून द्यावी, अशी मागणी होत आहे.