नदी उशाला, कोरड घशाला; पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:34 PM2024-04-24T16:34:51+5:302024-04-24T16:40:28+5:30
Gadchiroli : नदीकाठी असलेल्या गावांचीही टंचाईपासून सुटका नाही; पाण्यासाठी फिरावं लागत उन्हातान्हात
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा ४३ अंशांकडे सरकला अन् तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिक भीषण झाला. नदीकाठी असलेल्या गावांचीही टंचाईच्या झळांपासून सुटका नाही. गावाजवळून नदी वाहते; पण पावसाचे पाणी जमिनीत टिकवून ठेवण्यासाठीच्या सिंचन सुविधा अपुऱ्या असल्याने उन्हाळ्यात महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटत नाही, अशी इथली परिस्थिती.
हे चित्र आहे देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, चोप, शंकरपूर, विहिरीगाव, पोटगाव या गावांचे. या सर्व गावांजवळून गाढवी नदी वाहते. पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या या नदीमुळे काहीवेळा पूरस्थिती निर्माण होते. सगळीकडे पाणीच पाणी होते; पण उन्हाळ्यात मात्र येथील लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. पावसाचे नदीत वाहून येणारे पाणी टिकवून ठेवण्यासाठी ठोस उपाय झाले नाहीत, त्यामुळे येथे पावसाळ्यात पाण्यासाठी शिवारभर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. सकाळी झोपेतून उठल्यापासून सायंकाळपर्यंत या भागातील लोकांना पाण्याचीच चिंता असते.
गावातील विहिरी, बोअरमधील पाण्याची पातळी मार्च, एप्रिलपासूनच कमी व्हायला लागते, मे व जून महिन्यात टंचाईच्या झळा अधिकच तीव्र बनतात. त्यामुळे पाण्यावाचून या भागातील लोकांचे अक्षरशः हाल होत असल्याचे चित्र आहे.
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही गावांत जारचा व्यवसाय तेजीत आहेत. यातून काही जणांना रोजगार मिळत असला तरी इतरांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मासिक बजेटमध्ये पाण्याचा भुर्दंड
• घरखर्चासाठी अनेकजण महिन्याची तरतूद करून ठेवतात. मात्र यात पाण्याचा खर्चही वाढतो. त्यामुळे बजेट कोलमडून जाते. याचा फटका गोरगरीब व मजूर वर्गाला अधिक बसतो.
• परिणामी हातावर पोट असलेल्या कुटुंबांना विकतचे पाणी घेऊन तहान भागविणे कठीण होऊन जाते.
पाणी योजनाही कुचकामी...
• तालुक्यात पाण्यासाठी लाखो रुपयांच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत; पण भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यानंतर या योजनाही कुचकामी ठरत
असल्याचे विदारक चित्र आहे.
• जो भाग पाणीदार म्हणून ओळखला जातो, तेथेच लोकांचे उन्हाळ्यात हाल होतात.
अर्धा दिवस पाणी भरण्यातच जातो..
पूर्वी इतकी पाणीटंचाई कधीच जाणवत नसे. मात्र, गेल्या काही वर्षात एप्रिल महिन्यापासूनच पाण्याची खूप टंचाई भासत आहे. महिलांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. काही कुटुंबे विकतचे पाणी घेतात; पण सर्वांनाच विकतचे पाणी घेणे परवडत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.
- माधुरी राजगिरे, गृहिणी चोप
यात सर्वाधिक हाल हे महिलांचेच होतात. घरकाम करून त्यांना पाण्यासाठीही झुंजावे लागते. गेल्या काही वर्षांपासून पाण्याच्या टंचाईने अक्षरशः भंडावून सोडले आहे. नदीकिनारी गाव आहे. मात्र, त्याचा काहीही उपयोग नाही. घरपोहोच पाण्याच्या घोषणाही हवेतच आहेत.
- मंदा दुधकुवर, गृहिणी चोप