पाच तालुक्यांची भूजल पातळी खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:24 PM2018-11-18T23:24:20+5:302018-11-18T23:24:43+5:30
आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅगस्ट महिन्यातच पावसाने उसंत घेतल्याने पाच तालुक्यांमधील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या अगदी वेळेवर आगमन झाले. सुरूवातीचे काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने शेतीची कामे अगदी वेळेवर उरकली होती. असाच पाऊस सुरू राहिल्यास यावर्षी सरासरी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने कायमची उसंत घेतली. तेव्हापासून अजूनपर्यंत पाऊस पडला नाही. पाऊस कमी झाल्याने याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यांची पाणी पातळी घटली आहे.
पाणी पातळीचे निरिक्षण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात एकूण ११२ निरिक्षण विहिरी आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी या विहिरींच्या पाण्याची पातळी मोजतात. त्यावरून भूजल पातळीचा अंदाज वर्तविला जातो. विशेष म्हणजे, जलयुक्त शिवार अभियानमुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असला तरी हा दावा प्रत्यक्षात उतरला नसल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांची भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत घटली असली तरी पाण्याचा उपसा कमी असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत पाणी टंचाई निर्माण होत नाही, असा सर्वसाधारण दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र दिवसेंदिवस बोअरवेल, विहिरी यांची संख्या वाढत चालली असल्याने भूजलाचा उपसाही वाढला आहे. परिणामी भूजल पातळीत घट होत आहे. भविष्यात पाण्याची चिंता निर्माण होणार आहे.
सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या १.८८ टक्के पाऊस कमी झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी अत्यंत विषम प्रमाणात पाऊस झाला. दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले होते. तर दुसरीकडे गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गडचिरोली तालुक्यात सरासरीपेक्षा १५ टक्के, आरमोरी तालुक्यात सरासरीपेक्षा १८ टक्के, देसाईगंज ११ टक्के, कुरखेडा २२ टक्के, कोरची २३ टक्के, धानोरा १६ टक्के, चामोर्शी १५ टक्के कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. तर मुलचेरा तालुक्यात ९ टक्के, अहेरी २७ टक्के, एटापल्ली ५ टक्के, भामरागड २७ टक्के व सिरोंचा तालुक्यात सुमारे ४२ टक्के अधिक पाऊस झाला आहे.