आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाण्याची समस्या गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:38 AM2018-03-10T01:38:49+5:302018-03-10T01:38:49+5:30
ऑनलाईन लोकमत
आष्टी : राज्य सरकारच्या वतीने आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे. परंतु या रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आष्टी ग्रामीण रुग्णालयात इल्लूर, ठाकरी, मार्र्कंडा, चौडमपल्ली, अनखोडा, चंदनखेडी, उमरी, सिंगनपल्ली, चपराळा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बरेच रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी राहते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी तसेच इतर दैनंदिन वापरासाठी पाणी आवश्यक आहे. मात्र पाण्याची स्वतंत्र सुविधा ग्रामीण रुग्णालयाकडे उपलब्ध नाही. याबाबत वैद्यकीय अधिकाºयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही.
ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे. मात्र २४ तास पाण्याची व्यवस्था नाही. सदर पाणीपुरवठा योजनेच्या टाकीमध्ये ग्रामपंचायत आष्टीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी टाकले जाते. दवाखान्यात २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायतीला केली. परंतु ही पाणीपुरवठा योजना लोकसहभागातून असल्याने एक किंवा दोन नळ कनेक्शन देता येते. परंतु २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नाही, असे उत्तर ग्रामपंचायतीने दिले आहे. त्यामुळे रुग्णालयाचाही नाईलाज झाला आहे.
पाणी समस्येबाबत ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी वलके यांना विचारले असता मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील वर्षी टँकरने काही दिवस पाणी पुरवठा करण्यात आला होता, अशी माहिती दिली.