जिल्हाभरातील जलसाठे कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:57 AM2018-03-04T00:57:35+5:302018-03-04T00:57:35+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यंदा देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरासह जिल्हाभरातील नदी, नाले, बोड्या तलाव, वन तलाव कोरडे पडले आहेत.
ऑनलाईन लोकमत
विसोरा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा देसाईगंज तालुक्याच्या विसोरा परिसरासह जिल्हाभरातील नदी, नाले, बोड्या तलाव, वन तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्हा हा अतिपावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात अल्प पाऊस बरसला. तसेच गडचिरोली जिल्ह्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी बंधारे व इतर व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाचे नदीत पडलेले पाणी वाहून जाते.
गोंदिया जिल्ह्यातून वाहत येणारी व पुढे गडचिरोली जिल्ह्यातील आष्टीनजीकच्या शिवणी येथे प्राणहिता नदीला भेटणारी गाढवी नदी देसाईगंज तालुक्यासाठी कृषी क्षेत्राची संजीवनी म्हणून काम करते. मात्र यंदा या नदीचे पात्र कोरडे झाल्याने जलसंकट उभे ठाकले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या इटिया धरण यंदा अल्प प्रमाणात भरले. याचा परिणामी नदीच्या प्रवाहावर निघाला. त्यामुळे गाढवी नदी किनाऱ्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या हजारो हेक्टरवरील शेतीवर परिणाम झाला. शिवाय गाय, बैल, म्हैस, शेळी आदी पाळीव प्राणी, वन्यप्राणी, पक्षी, जलचर प्राणी व वनस्पतीवर प्रतिकूल परिणाम पडत आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने नदीला अत्यल्प पाणी आहे. अशा स्थितीत नदी पात्रात पाणी अडविण्यासाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले. शिवाय रेतीचे बंधारे बांधण्यात आले. नदीचे पाणी जागोजागी साचून राहत आहे. शेतकºयांनी सिंचनाच्या हेतूपोटी नदी पाणी प्रवाह बंद होतील, असे अनेक प्रयत्न केले. त्यामुळे नदीचे पात्र कोरडे झाले आहे.
रेती व लाकडे शिल्लक
गाढवी नदीवरील पुलाच्या खाली व दोन्ही बाजुचे नदी पात्र पूर्णत: कोरडे झाले आहे. आता मृतदेह जाळल्यानंतरचे जळलेल्या अवस्थेतील लाकडे व रेती शिल्लक असल्याचे दिसून येते. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने इटिया डोहाचा कालवा व गाढवी नदीच्या पाण्यावर उन्हाळी धान फसल नसल्याचे दिसून येते.