टिल्लूपंपांमुळे शहरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:51+5:302021-06-18T04:25:51+5:30
गडचिरोली : शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या ...
गडचिरोली : शहरातील अनेक वाॅर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. मोटार पंप लावल्यामुळे उर्वरित नळांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मोटार लावणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे.
शाैचालय वापराची जागृती करा
एटापल्ली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, आदी दुर्गम तालुक्यांतील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.
मामा तलावांचे अस्तित्व धाेक्यात
वैरागड : अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. हे अतिक्रमण हटविण्याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर लगतच्या तलावात अतिक्रमणधारकांनी पक्की घरे बांधली आहेत.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली, आदी गावांचा संपर्क आहे.
जि. प. शाळांना संरक्षण भिंतीची प्रतीक्षा
आलापल्ली : दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षण भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारण्यात आले नाही. परिणामी गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालत आहेत.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केली आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होत होता. मात्र, वीज बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून लोहा, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरांतही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी पाच लाखांत होणाऱ्या घर बांधकामासाठी आता १२ लाखांहून जास्त खर्च लागत आहे. खर्च वाढल्याने घर बांधणारे अनेकजण कर्जात सापडले आहेत.
चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून आजवर पाच ते दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. यासाठी शिबिर घेऊन परवाने द्यावेत.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा अशी मागणी करण्यात आली; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात.
रेपनपल्ली-कमलापूर रस्त्याची दुरवस्था
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहे. अनेक पुलांना कठडेही लावण्यात आलेले नाही.
चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त
धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून, टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
आश्रमशाळेत सफाई कर्मचारी भरा
गडचिरोली : तिन्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे आश्रमशाळेतील शौचालय व प्रसाधनगृह घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. प्रत्येक आश्रमशाळेत सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरावी, अशी मागणी होत आहे.
आरमोरी मार्गावरील पथदिवे बंद
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील बहुतांश पथदिवे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे या मार्गावर अंधार पसरला जातो. पहाटेच्या सुमारास या मार्गावर अनेक नागरिक फिरण्यासाठी जातात. नगरपरिषदेने पथदिवे लावावेत, अशी मागणी होत आहे.
बसस्थानकातील वाहने नियंत्रण विना
गडचिरोली : बसस्थानक परिसरात प्रवासी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही. तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक अस्ताव्यस्त वाहने ठेवतात.
व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध वस्तू विकत असतात. या दुकानांसमोर उभे राहून अनेक नागरिक वस्तू खरेदी करतात. यामुळे वाहतूक प्रभावित होते. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात वीजचोरी वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे.
मद्यपी वाहनचालकांकडे दुर्लक्ष
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्या, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.
बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांंवर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
‘त्या’ विद्युत खांबांनी अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. ते खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.
टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वनविभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.