उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई
By admin | Published: March 28, 2017 12:38 AM2017-03-28T00:38:34+5:302017-03-28T00:38:34+5:30
नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे.
दोन दिवसाआड मिळते पाणी : आरमोरीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती; नगरपंचायतीचे दुर्लक्ष
आरमोरी : नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप बंद असल्याने उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच आरमोरी शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
आरमोरी शहरातील बाजारपेठ, ताडुरवारनगर, शास्त्रीनगर, भगतसिंग चौकातील भाग, काळागोटा आदी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळा तापत असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता नागरिकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत मागणीकडे नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक वार्डातील हातपंप नादुरूस्त आहेत. तर काही हातपंपांमधून दोन ते तीन गुंड पाणी भरल्यावर हातपंपावर पाणीच येत नाही, अशी अवस्था आहे.
हातपंप दुरूस्तीकरिता विविध वार्डातून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सूचना करूनही तांत्रिक अडचणी समोर करून नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील बहुतांश वार्डांना दोन दिवसांतून एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरगुती पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.
नागरिकांना पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हे नगर पंचायतीची जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. शहरातील शेगाव तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनी नळ जोडणीची मागणी करूनही नगर पंचायतीचे पाणी या भागात पोहोचले नाही.
पिण्याच्या पाण्या संर्भात अनेक समस्या आहेत. नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
टिल्लू पंपांकडे दुर्लक्ष
शहरातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावतात. त्यामुळे बहुतांश नळधारकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. टिल्लूपंप हे अवैध असून सदर पंपधारकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
शहरातील पाण्याची समस्या सोडण्यिासाठी नगर पंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.