शहरातील पाणीटंचाई दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:28 AM2019-01-10T01:28:13+5:302019-01-10T01:28:43+5:30
दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सदर तिन्ही मोठी कामे झाल्यानंतर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यादृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत.
पालिका प्रशासनाच्या वतीने येथील सुभाष वार्ड व फुले वॉर्डासाठी पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी व नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आलले आहे. या कामासाठी शासनाकडून पालिकेला २ कोटी ६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून निविदा मागविल्या आहेत. प्रशासनाकडे तीन ते चार निविदा प्राप्त झाल्या असून येत्या तीन-चार दिवसात सदर कामाचे संबंधित कंत्राटदारांना वर्कआदेश देण्यात येणार आहे. पाणी योजनेच्या संदर्भात राज्याच्या नगर विकास विभागाने अलीकडेच एक शासन निर्णय काढून ९.९९ अधिक दर कामाला द्या, असे पालिकेला सुचित केले आहे. सध्याच्या सीएसआरनुसार वाढत्या दराने नगर विकास विभागाने पाणी योजनेच्या कामात बदल केला आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. लवकरच या पाणी टाकीचे काम सुरू होणार असून शहराच्या सुभाष व फुले वार्डातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
विसापूर, विसापूर टोली हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होतो. पालिकेच्या वतीने उन्हाळ्यात विसापूर या एकमेव भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या वतीने विसापूर भागात पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी व नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी पालिकेला २ कोटी १६ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. पालिकेच्या वतीने या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.
प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर पालिकेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
४५ कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित
शहरातील अनेक वॉर्डातील नळ पाईपलाईन फार जुनी आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. परिणामी शहरात पाण्याचे असमान वाटप होते. यातून उन्हाळ्यात बऱ्याच कुटुंबांना पुरेशे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल ४५ कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर या बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासन व महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. सदर योजनेसाठी जिल्हा विकास निधीतून पालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालिकेच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
दोन टाक्यांचे होणार बांधकाम
४५ कोटी रूपयांच्या निधीतून वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात दोन नवीन पाणीटाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये गोकुलनगर भागात सात लाख लिटर क्षमतेची व इंदिरा गांधी चौक परिसरात १४ लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार आहे. याशिवाय बोरमाळा मार्गावरील फिल्टर प्लान्टवर एक अतिरिक्त पंप बसविण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत अधिक क्षमतेची मोठी पाईपलाईन शहरात बसविण्यात येणार आहे. दरम्यान सर्व शहराचे झोन पाडून नवे वॉल्व बसविण्यात येणार आहे. जुन्या पाईपलाईनच्या ठिकाणी १०३ किमी अंतरावर नवी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व बाबी प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत.