कुरखेडा शहरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 01:30 AM2017-03-11T01:30:58+5:302017-03-11T01:30:58+5:30
कुरखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवरील नळ पाणी योजनेच्या विहिरीची पातळी
टाकीची क्षमता तिप्पट : पुरवठा मात्र एक लाख लिटरचा
कुरखेडा : कुरखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवरील नळ पाणी योजनेच्या विहिरीची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने ऐन उन्हाळाच्या सुरूवातीला कुरखेडा शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
नदी पात्रातून सिंचनासाठी सुरू असलेला पाण्याचा उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी कुरखेडा नगर पंचायतीचे पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे. कुरखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवरील जुन्या विहिरीच्या माध्यमातून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागते. ही समस्या लक्षात घेऊन तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी तीन लाख लिटर क्षमतेची पाणी योजना मंजूर केली. ग्रा.पं. प्रशासनाने तीन लाख लिटर क्षमतेच्या विहिरीचे बांधकाम केले. या कामावर एक कोटीपेक्षा अधिक खर्च झाला. मात्र सदर योजना सुरूवातीपासूनच वादग्रस्त व कुचकामी ठरली आहे. तीन लाख लिटर क्षमतेची विहीर आहे. मात्र एक लाख लिटर एवढाच पाणी पुरवठा शहरात होत आहे. शहरातील १७ प्रभागांपैकी पाच प्रभागात दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवर असलेल्या विहिरीच्या जवळ सती नदीच्या पात्रातून कुरखेडा व कुंभीटोला येथील १५ ते २० शेतकऱ्यांकडून रबी हंगामातील पिकांसाठी मोटारपंपद्वारे पाण्याचा उपसा होत आहे. परिणामी नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. एप्रिल, मे व जून महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात नदी पात्रातील पाण्याची पातळी अधिकच खालावणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न आणखीच भीषण होणार आहे.
चौकशी करणार
पाणी पुरवठा सभापती गोटेफोडे यांनी तहसीलदार अजय चरडे यांची भेट घेऊन शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडला यावर तहसीलदार चरडे यांनी मोका चौकशी करून कायदेशीर बाबी तपासण्यात येईल. त्यानंतर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.