चिचडोह बॅरेजमध्ये पाणीसंचय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:11 AM2018-10-13T01:11:19+5:302018-10-13T01:11:58+5:30
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी.वर असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या बॅरेजचे दरवाजे बंद करण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी.वर असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या बॅरेजचे दरवाजे बंद करण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली. येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत सर्व ३८ दरवाजे बंद केले जाणार आहेत. त्यामुळे यावर्षी रबी पिकांना या प्रकल्पाचे पाणी मिळू शकेल.
सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस ४ कि.मी.वर आहे. बॅरेजची एकूण लांबी ६९१ मिटर असून १५ मिटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ पोलादी दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.
शुक्रवार दि.१२ पासून दरवाजे बंद करण्यास सुरूवात झाली. पुढील तीन दिवस हे काम चालणार आहे. त्यामुळे नदीपात्राच्या उर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे. नदीतील पाण्याची पातळीही वाढणार आहे. या पाणीसाठयामुळे जिवित व वित्तहाणी होवू नये म्हणून सर्व लगतच्या गावांना व ग्रामपंचायतींना सूचित करणे सुरू आहे. नदी काठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कराहण्याच्या सूचना या विभागाने दिल्या आहेत.
ज्या शेताचे भूसंपादन किंवा सरळ खरेदी करण्यात आली आहे त्या सर्व भूधारकांनी शेतातील कामे करताना खबरदारी घ्यावी किंवा खरेदी करण्यात आलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करु नये. सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी, अशी माहिती लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर यांनी दिली आहे.