दहा दिवसांपासून भेंडाळातील पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:01+5:302021-02-10T04:37:01+5:30
भेंडाळा : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत भेंडाळा येथील नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माेटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गेल्या १० दिवसांपासून गावात नळ ...
भेंडाळा : चामाेर्शी पंचायत समितीअंतर्गत भेंडाळा येथील नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माेटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने गेल्या १० दिवसांपासून गावात नळ पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प आहे. परिणामी गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ याेजनेची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयावर घागर माेर्चा काढणार, असा इशारा महिलांनी दिला आहे.
वाघोली येथील नदी घाटावरील इन्वेल टाकीवर बसवलेली मोटार वर आली आणि पाणी तळाशी गेले. त्यामुळे भेंडाळा गावाला पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीवर महिलांचा घागर मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा या गावाची लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. भेंडाळा गावापासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ ते ४० वर्षांपूर्वी गावालगत एका शेतात विहीर खोदून ५० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा नळयोजना कार्यान्वित करण्यात आली होती. कालांतराने गावातील वाढती लोकसंख्या व पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन साधारणतः सहा ते सात वर्षांपूर्वी वाघोली येथील वैनगंगा नदीवर दुसरी वाढीव पाणीपुरवठा योजना ४० हजार लीटर क्षमतेची सुरू करण्यात आली. त्यामुळे एकंदरीत ९० हजार लीटर क्षमतेच्या दोन नळयोजनांच्या टाक्या अस्तित्वात असूनदेखील गावांतील लोक ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर तहानलेलेच असल्याचे चित्र दिसत आहे. वाघोली येथील नदी घाटावर भेंडाळा पाणीपुरवठा योजनेची इन्वेल टाकी तयार केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून टाकीवर असलेली मोटार वर आली व टाकीतील पाणी तळाशी गेल्यामुळे पाइपद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी बाहेर निघू शकत नाही. त्यामुळे भेंडाळा येथील पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून दहा दिवसांआड पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. कधी-कधी दहा दिवसांनंतरही पाणी मिळत नाही. अशी स्थिती भेंडाळा गावाची झाली आहे. या गावामध्ये घरोघरी नळ योजना असूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस अशा उपाययोजनेची आवश्यकता आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप ग्रामस्थांकडून हाेत आहे. गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास ग्रामपंचायत प्रशासन उदासीन दिसत आहे. या गावात पाण्याची समस्या गेल्या ५० वर्षांपासून सुटलेली नाही. तरी या परिसरातल्या लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या आठवडाभरात गावातील नळ पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी न लागल्यास ग्रामपंचायत भेंडाळा व पंचायत समिती चामाेर्शी पं.स. कार्यालयावर महिलांचा घागर माेर्चा काढूू, असा इशारा पं.स. सदस्य धर्मशीला सहारे यांनी दिला आहे.