पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:27 PM2024-05-17T15:27:00+5:302024-05-17T15:27:27+5:30
पुरात पाइप वाहून गेले: थकबाकीमुळे वीजपुरवठाही तोडला
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तालुक्यातील कुरुळ, विसापूर क्षेत्रातील सोळा गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षी पुरात पाइप वाहून गेले तर थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे या सर्व गावांच्या नशिबी ऐन उन्हाळ्यात हाल आहेत.
तालुक्यातील कुरुळ, रामपूर, रामपूर टोली, देवडी, वांलसरा, भिवापूर, राजानगट्टा, कुंभारवाही, आमगाव महाल, हिवरगाव, खोर्दा, विसापूर, जानाळा, रेखेगाव, अनंतपूर या सोळा गावांतील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा योजना सुरू करण्यात आली. मात्र वर्षभराच्या आतच योजना बंद पडली.
मागील पावसाळ्यात विसापूर नदीमधील पाइप पुरात वाहून गेले होते. शिवाय योजनेचे ४१ हजार रुपये वीजबिल थकीत होते. वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने कनेक्शन तोडले. त्यामुळे ही योजना बंद आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना स्वच्छ व द्वारपोहोच पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, ही योजना सुरू करावी, या मागणीसाठी भाजपचे महामंत्री मधुकर भांडेकर यांनी जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांची भेट घेतली. त्यांनी पाणी टंचाईची समस्या मांडली.
हर घर जल या योजनेमुळे प्रत्येकाला घर घर स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. त्यामुळे विहीर व बोअरवेलचे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, ही मोठी आशा निर्माण झाली होती. मात्र, ती योजनाच बंद असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत स्वच्छ पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे हाल होत आहेत.
- वेणू दयाल भांडेकर, वालसरा
बऱ्याच वर्षांपासून पिण्याचे पाणी विहीर, बोअरवेलद्वारा मिळत होते. मात्र, ही योजना या परिसरासाठी सुरू झाली म्हणून आम्हास आता स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली. पण ती अल्पावधीत बंद पडल्याने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यासाठी त्वरित योजना सुरू करावी.
- रमेश सातपुते, माजी उपसरपंच कुरुळ
सदर योजना ही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप हस्तांतरित करण्यात आली नाही. ती योजना अद्यापही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडेच आहे, मात्र, त्या योजनेत काही दुरस्त्या असून विद्युत बिलाची रक्कम ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरण्याच्या सूचना केल्या आहेत. योजना सुरू करण्याबाबत मार्ग काढण्यात येईल.
- नितीन पाटील, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.
वस्ती वाढली, योजनांचा विस्तार कधी होणार ?
चामोर्शी तालुक्यातील बहुतांश गावांतील लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली. या गावांमध्ये अजूनही जुनीच नळयोजना आहे. लोकसंख्येचा विस्तार झाल्यानंतर वाढीव नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करणे, ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती; परंतु या जबाबदारीला बगल देत उपाययोजना केल्या नाहीत. आतासुद्धा काही गावांमध्ये जुन्याच पाणीपुरवठा योजनेच्या भरवशावर नवीन कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे किती लोकांना आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होईल, हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे.