चार गावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:35 AM2021-04-06T04:35:47+5:302021-04-06T04:35:47+5:30
भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना ...
भेंडाळा : चामाेर्शी तालुक्यातील पाणीपुरवठा याेजना विविध कारणांमुळे बंद असल्याने परिसरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भेंडाळा परिसरातील लखमापूर बोरी, सगणापूर, नवेगाव माल, कान्होली गावातील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने या गावातील नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्याने गावातील पाणीपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिक भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत बिलाचा भरणा करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ७२ हजार रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीस देण्यात आला होता. परंतु, ग्रामपंचायतच्या बँकेतील खात्यामध्ये रक्कम नसल्याने महावितरण कंपनीला धनादेश परत करण्यात आला. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लखमापूर बोरी येथील पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. नवेगाव माल येथील हनुमान मंदिराजवळ असलेला हातपंप गेल्या चार- पाच दिवसांपासून बंद आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तसे पंचायत समितीस्तरावर कळविले. परंतु, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या भागात राहणारे नागरिक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. सगणापूर गावातील पाणीपुरवठा योजना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गेल्या चार दिवसांपासून प्रभावित झाली आहे. गावातील नळ कनेक्शन धारकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाप्रति तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. या गावातील दुकानाशेजारी असलेल्या हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे. येथील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बाॅक्स
कान्हाेलीतील नळयाेजना १० वर्षांपासून बंद
कान्होली गावात दहा वर्षांपूर्वी जलकुंभ व पाणीपुरवठा विहीर बांधकाम करण्यात आले. त्यामुळे गावातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने अल्पावधीतच ही पाणीपुरवठा योजना बंद झाली. मात्र, बंद झालेल्या पाणीपुरवठा योजनेकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने योजना गेल्या दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. येथील जलकुंभ पांढरा हत्ती ठरत आहे.
गावागावांतील पाणीपुरवठा योजना प्रभावित व नादुरुस्त हातपंप यामुळे महिलांना पाण्यासाठी अडचण येत आहे. भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्याने पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.