धानोरात टँकरने पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:10 AM2019-04-22T00:10:59+5:302019-04-22T00:11:27+5:30
तापमान वाढल्यामुळे धानोरा शहरातील व परिसरातील पाणीस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या अर्ध्या भागात नगर पंचायत प्रशासन तसेच पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्या पुढाकाराने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तापमान वाढल्यामुळे धानोरा शहरातील व परिसरातील पाणीस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या अर्ध्या भागात नगर पंचायत प्रशासन तसेच पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्या पुढाकाराने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
धानोरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या हेटीलगतच्या तलावावर नगर पंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आता या तलावातील पाणीपातळी कमी झाल्याने शहराच्या चढ भागात नळाचे पाणी पोहोचत नाही. विशेषत: धानोरा शहरात बाराही महिने एकचवेळा पाणी सोडले जाते. शहरातील सार्वजनिक हातपंप व विहिरींची पाणीपातळी खालावल्याने सध्या शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नगर पंचायतीच्या वतीने गेल्या आठवडाभरापासून पाणीटंचाई असलेल्या वॉर्डांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्यातर्फे सोडे मार्गावरील नवा प्लाट परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नगर पंचायतीच्या वतीने दररोज दोन ते तीन टँकर वॉर्डात पोहोचविले जात आहे. तर बरच्छा यांच्या वतीने दररोज पाच ते सहा टँकर वॉर्डा-वॉर्डात मोफत पोहोचविले जात आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत सदर टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याचा उपक्रम सुरूच राहणार, अशी माहिती नगरसेवक ललीत बरच्छा यांनी दिली आहे. पाणीटंचाई असलेल्या वॉर्डांमध्ये टँकर पोहोचल्यानंतर घागर घेऊन गेलेल्या महिलांची गर्दी उसळत आहे. पाणीटंचाईची समस्या असल्याने धानोरा शहरात पाण्याचा वापरही नागरिकांकडून काळजीपूर्वक केला जात आहे. मे महिन्यात धानोरा शहरात पाणीसंकट आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपाययोजनांची गरज आहे.
वराती डोहावर होणार नवी पाणी योजना
धानोरा शहरात व चढभागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असते. पाणी मिळविण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच लगबग सुरू होते. ही समस्या मार्गी लावण्यासाठी न.पं.च्या वतीने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ही योजना वराती डोहावर होणार आहे.