मोटद्वारे शेतीला पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:51 PM2018-03-12T23:51:26+5:302018-03-12T23:51:26+5:30
सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा व असरअल्ली भागात शासनाकडून फारशा सिंचन सुविधा करण्यात आल्या नाही.
आॅनलाईन लोकमत
अंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा व असरअल्ली भागात शासनाकडून फारशा सिंचन सुविधा करण्यात आल्या नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने मोटद्वारे आपल्या शेतीला पाणीपुरवठा करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड दिसून येते.
अंकिसापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आसरअल्ली येथील राष्ट्रीय महामार्गालगत शेतकरी बाजारू मल्लूमेरा आदे यांची अर्धा एकर शेती आहे. त्यांनी या शेतीत कांदे व रताळे व इतर पिकांची लागवड केली आहे. मात्र आता उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा परिस्थितीत बैलांच्या सहाय्याने मोटद्वारे विहिरीतील पाणी पिकांना दिले जात आहे. या कामात वयोवृद्ध शेतकरी बाजारू आदे यांना त्यांची पत्नी लसमम्मा या सहकार्य करीत आहेत.
शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बोअर खोदण्याकरिता शेतकरी आदे यांच्याकडे आर्थिक पुंजी नाही. तसेच शासकीय योजनेतून आदे यांना बोअरचा लाभ मिळाला नाही. अशीच स्थिती अंकिसा भागातील अनेक शेतकऱ्यांची आहे.