पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:08 AM2018-04-15T01:08:44+5:302018-04-15T01:08:44+5:30
आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. मात्र या योजनेतून आष्टी शहरवासीयांना पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेतून दोन नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे.
आष्टी येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला. या योजनेतून पाणीपुरवठा योजनेच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले. चार वर्ष उलटूनही सदर काम अपूर्ण आहे. परिणामी आष्टी शहरात काही ठिकाणी अद्यापही पाणी पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत २०१४-१५ मध्ये १ कोटी ९८ लाख रूपयांचा प्रस्ताव वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाला पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. त्यानंतर कंत्राटदाराने काम सुरू केले. पाण्याची टाकी बांधून पूर्ण झाली. अर्ध्या गावात पाईपलाईनचेही काम पूर्ण झाले. त्यानंतर मात्र कंत्राटदाराने सहा महिन्यांपासून काम बंद ठेवले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कंत्राटदाराला आतापर्यंत १ कोटी २५ लाख रूपये देण्यात आले आहे. मात्र उर्वरित काम बंद असल्याने भर उन्हाळ्यात पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून कंत्राटदारास काम पूर्ण करण्याबाबत निर्देशित करावे व पाणीपुरवठा लवकर सुरू करावा, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार
आष्टी शहरात पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. परंतु केवळ टाक्यांचे बांधकाम व पाईपलाईन टाकण्याचे काम करून अर्धवटस्थितीत काम कंत्राटदाराने सोडले. पूर्वीच गावातील अनेक भागात नळ योजना पोहोचली नव्हती. आता नळ योजनेची पाईपलाईन पोहोचली आहे. परंतु काम अर्धवट असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार आहे.