चामोर्शीत जलसंकटाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:13 PM2019-05-25T23:13:29+5:302019-05-25T23:13:49+5:30
वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : वाढत्या तापमानामुळे चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जलसाठे कोरडे पडत आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या व विहिरींनी तळ गाठला असून तलावाच्या पाण्याला डबक्याचे स्वरूपात प्राप्त झाले आहे. परिणामी चामोर्शी तालुक्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चामोर्शी तालुक्यात एकूण १ लाख ६३ हजार ४१४ इतकी लोकसंख्या असून ७५ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती अंतर्गत १८० गावे व ४२ टोल्यांचा समावेश आहे. जलस्त्रोताचा विचार केला असता, शासकीय विहिरींची संख्या ७९३ व खासगी विहिरींची संख्या २ हजार ३२० आहे. हातपंपाची संख्या १ हजार ७३७ इतकी आहे. यापैकी पंचायत समितीच्या वतीने १ हजार १६७ हातपंपाची दुरूस्ती करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायत मार्फत ५७० हातपंपाची दुरूस्ती झाली आहे. विद्युतपंप दोन असून सौरऊर्जेवरील दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना जवळपास ४४ आहे. सिंचन उपविभागांतर्गत असलेल्या दिना जलाशयात सध्या जलसाठा निरंक असून कुनघाडा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावात १९.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर अनखोडा, घोट, तळोधी येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. मे अखेरपासून तापमानात आणखी वाढ होणार असल्याने पाणी पातळी खालावणार आहे. परिणामी चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणी समस्या तीव्र होणार आहे.
जनावरांसाठीही पाण्याचा दुष्काळ
चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा, विठ्ठलपूर येथील तलावातही पाणीसाठा शिल्लक नाही. नागरिकांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. तसेच पाळीव जनावरांसाठीही पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाळीव जनावरांसाठी तहाण कशी भागवावी, असा प्रश्न चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. पाणी समस्या तीव्र होत असल्याने अनेक पशुपालक आपले जनावरे विकण्यासाठी तयारही झाले आहेत. जनावरांपेक्षा ट्रॅक्टरचा वापर करण्यावर शेतकरी भर देत आहेत.