‘एक रुपयाही नको, फक्त दारूबंदीची हमी द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 03:38 PM2019-08-16T15:38:25+5:302019-08-16T15:40:33+5:30
राखीची ओवाळणी म्हणून फक्त आमच्या गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची हमी द्या,’ अशी भावनिक सादर घालत महिलांनी देसाईगंज ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ‘गावात कधी चोरून लपून तर कधी उघडपणे दारूविक्र ी होत असते. याचा त्रास आया-बहिणींनाच सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत दादा आम्हाला तुमचाच आधार आहे. आम्हाला एका रुपयाही नको, राखीची ओवाळणी म्हणून फक्त आमच्या गावात दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची हमी द्या,’ अशी भावनिक सादर घालत महिलांनी देसाईगंज ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
गुरु वारी (दि.१५) तालुक्यातील कोंढाळा, कुरु ड, कोकडी आणि विसोरा आदी गावांसह देसाईगंज शहरातील शिवाजी वार्ड, कन्नमवार वार्ड, गांधी वार्ड येथील २७ महिला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ओवाळणीचे साहित्य घेऊन देसाईगंज पोलीस ठाण्यात आल्या. गावातील दारूविक्री कायमची बंद करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. आपली ही अपेक्षा पोलिसांनी राखीच्या ओवाळणीच्या स्वरूपात पूर्ण करावी म्हणून त्यांनी पोलिसांना ‘रक्षाबंधना’त बांधून घेण्याचे ठरविले. त्यांनी उपस्थित सर्व पोलिसांना राख्या बांधल्या आणि आम्हाला ओवाळणी म्हणजे एक रुपयाही टाकू नका, पण दारूबंदी करा, असे साकडे घातले.
संध्याकाळ झाली की दारूमुळे गावात भांडणे होतात. मारामाºया होतात. दारू विक्र ेते जीवे मारण्याची धमकी देतात. हे सर्व बंद होऊन सुखाने जगण्यासाठी आमच्या गावातील दारूविक्र ी बंद करा, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी ओवाळणी ठरेल, असे सांगत त्यांनी या मागणीचे लेखी निवेदनही सादर केले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक रोशनी गुरूकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक लांडे यांनी सर्व पोलिसांच्या वतीने दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी वचन म्हणून महिलांना दिली. पोलीस तुमच्या पाठीशी २४ तास असल्याचे सांगत विक्री बंद करण्यासाठी पोलिसांना तुमच्या मदतीची गरज असल्याचेही सांगितले. तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. पालक म्हणून त्यांना यापासून परावृत्त करणे ही कुटुंबियांची जबाबदारी असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दारूविक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महिलांशी चर्चा करून लवकरच कृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.