अनाथ मुलीचा लावला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:09 AM2018-02-22T01:09:29+5:302018-02-22T01:10:11+5:30
जगात ज्याला कुणी नाही त्याच्या पाठिशी देव आहे, असे म्हणतात. याचाच प्रत्यय सोमवारी घोट येथे आला. लोकमंगल या सामाजिक संस्थेने अनाथ मुलीचा विवाह लावून दिला.
ऑनलाईन लोकमत
घोट : जगात ज्याला कुणी नाही त्याच्या पाठिशी देव आहे, असे म्हणतात. याचाच प्रत्यय सोमवारी घोट येथे आला. लोकमंगल या सामाजिक संस्थेने अनाथ मुलीचा विवाह लावून दिला.
सलोनी लक्ष्मण मडावी रा. बल्हारपूर जि. चंद्रपूर व दीपक जीवनदास निशाने रा. मुरखळा ता. चामोर्शी असे विवाहबद्ध झालेल्या जोडप्याची नावे आहेत. सलोनी मडावी ही २०११ पासून मातोश्री निराश्रीत महिला अल्प मुदती निवासगृह घोट येथे आश्रयाला होती. सलोनी लहान असतानाच तिची आई दुसºयासोबत पळून गेली व लग्न केले. सलोनीच्या वडिलांनीही दुसरा विवाह केला. त्यामुळे सावत्र आईने तिला घराबाहेर काढून दिले. शेवटी सलोनी मावशीच्या आश्रयाला आली. परंतु नंतर मावशीनेही लग्न केल्याने ती अनाथ झाली. ना घर ना नातेवाईक, अगदी कोवळ्या वयात ती इतरत्र भटकत होती. मिळेल तिथे खात होती. अशीच रस्त्याने भटकत असताना बल्हारपूर पोलिसांना ती आढळली. पोलिसांनी तिला या संस्थेत आणून दिले. ती लहान असल्याने मनातील दु:ख तिला सांगता येत नव्हते. अशा अवस्थेत लोकमंगल संस्थेने तिला आश्रय दिला. मायेची ममता दिली. सुशिक्षित केले. आयुष्यात आईवडिलाची तिला उणीव भासू दिले नाही. उद्ध्वस्त झालेले जीवन सुधारले आहे. १९ फेब्रुवारीला धार्मिक रितीरिवाज व परंपरेनुसार तिचा विवाह सोहळा पार पाडला.
याप्रसंगी तंमुस अध्यक्ष रमेश दुधबावरे, उपसरपंच साईनाथ नेवारी, कर्दुळचे पोलीस पाटील हरिदास चलाख, रमेश श्रुंगारपवार, गिरजाशंकर उपाध्ये, डॉ. महेंद्र श्रुंगारपवार यांच्यासह संस्थेचे प्रमुख सिस्टर शाईनी, सजीवा, निर्मला, सबीना, कार्यकर्ते मनोहर मेश्राम, वातूजी नेवारे उपस्थित होते.