रोवणी कामानंतर निंदणी कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:41 AM2021-08-28T04:41:12+5:302021-08-28T04:41:12+5:30
शेतकरी रोवणी झाल्यानंतर निंदणी काम आटाेपल्यावर पिकाला खताची मात्रा देत असतात. या वर्षी पाऊस जेमतेम येत असल्याने पिकात तणांची ...
शेतकरी रोवणी झाल्यानंतर निंदणी काम आटाेपल्यावर पिकाला खताची मात्रा देत असतात. या वर्षी पाऊस जेमतेम येत असल्याने पिकात तणांची जोमाने वाढ झाली आहे. यासाठी शेतकरी सकाळच्या सुमारास निंदणी काम करताना दिसून येत आहेत. तर काही शेतकरी अजूनही अंतिम टप्प्यातील रोवणी काम करताना दिसून येत आहेत. रोवणी कामानंतर अजूनही दमदार पाऊस आला नाही त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. तसेच वर पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील शेतात पाण्यामुळे पीक करपण्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली असून वातावरणात बदल होऊन प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. पावसाच्या महिन्यात श्रावणसरीऐवजी घामाच्या धारा वाहू लागत आहेत. वातावरणातील बदल पिकांसाठी घातक ठरत असून पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पिकांवर फवारणी करून पीक रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वातावरणातील बदल शेतकऱ्यांना अडचणीचे जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत. पुढील सप्टेंबर महिना पाऊस माघारी असणारा महिना आहे. भर पावसाळ्यात अजूनही जलस्रोत अपेक्षित पाणी दिसून येत नाही. शेतकऱ्यांना धानपीक जगविण्यासाठी मोठ्या धडपडीचा सामना करावा लागणार असून शेतकरी रोवणी करूनही मोठ्या चिंतेत दिसून येत आहे.
बाॅक्स :
महिलांना १५० रुपये मजुरी
दिवसभर ऊन तापू लागले असून उकाडा वाढत आहे. त्यामुळे अशा अवस्थेत निंदण कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. काही शेतकरी निंदण काम सकाळच्या सुमारास करीत आहेत, तर काही ठिकाणी दुपारच्या पाळीत कामे सुरू आहेत. या कामासाठी महिलांना १५० रुपये मजुरी दिली जात आहे.