आठवडी बाजाराचे रूप पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:11 AM2018-12-15T01:11:24+5:302018-12-15T01:12:12+5:30
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या येथील आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून आता येत्या दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून हनुमान वॉर्डालगतच्या आठवडी बाजारात शेड, ओटे, सिमेंट काँक्रीट रस्ते व नाल्या आदींचे काम होणार असल्याने या बाजाराचे रूप पालटणार आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या येथील आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून आता येत्या दोन ते तीन दिवसात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. तब्बल तीन कोटी रूपयांच्या निधीतून हनुमान वॉर्डालगतच्या आठवडी बाजारात शेड, ओटे, सिमेंट काँक्रीट रस्ते व नाल्या आदींचे काम होणार असल्याने या बाजाराचे रूप पालटणार आहे.
न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे पालिकेच्या वतीने मंजूर झालेल्या आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून थंडबस्त्यात होते. मात्र आता या कामाचा तिढा सुटला असून सदर कामाच्या निधी खर्चासाठी राज्य शासनाने मार्च २०१९ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. या संदर्भातील नगर विकास विभागाचे पत्र गडचिरोली पालिकेला प्राप्त झाले आहे. आठवडी बाजारात कच्च्या स्वरूपाचे रस्ते व खोलगट भाग असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत होते. चिखल तुडवत ग्राहकांना भाजीपाला खरेदी करावा लागत होता. विक्रेत्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन पालिकेच्या वतीने आठवडी बाजार सौंदर्यीकरणाचे काम जानेवारी २०१६ मध्ये मंजूर करण्यात आले. यासाठी शासनाकडून तीन कोटी रूपयांचा निधीही प्राप्त झाला आहे. मात्र न्याप्रविष्ठ प्रकरणामुळे या बाजाराचे काम दोन वर्ष रखडून होते. आता या कामाचा तिढा सुटला असून पालिकेच्या वतीने २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात आर. आर. कंन्स्ट्रक्शनच्या नावाने कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.
सदर काम मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनासह संबंधित कंत्राटदाराने हालचाली गतीने वाढविल्या आहेत. आठवडी बाजारात काही विद्युत खांबामुळे बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील वीज खांब इतर ठिकाणी हलवावे अशा आशयाचे पत्र पालिकेच्या वतीने महावितरण कार्यालयास पाठविण्यात आले आहे.
नगरभवन परिसरात आठवडी बाजार जाणार
आठवडी बाजाराच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत येथील आठवडी बाजार चंद्रपूर मार्गावरील नगर भवन परिसरात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. तसेच येथील चिकन व मटन मार्केट हे मच्छी मार्केट मागील कांझी हाऊस परिसरात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या संदर्भात विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आठवडी बाजारातील विक्रेत्यांची ७ डिसेंबरला बैठकही घेतली होती. या बैठकीत सकारात्मक विचार विनिमय करण्यात आला. दैनंदिन गुजरी बाजारातील जे विक्रेते आठवडी बाजारात बसतात, अशा विक्रेत्यांची बैठक १७ डिसेंबर रोजी नगर पालिकेत बोलाविण्यात आली आहे.
अतिक्रमणधारकांना बजावली नोटीस
चंद्रपूर मार्गावरील नगर भवनच्या समोरील व परिसरातील अतिक्रमणधारकांना पालिकेच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली आहे. संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून पालिकेस सहकार्य करावे, असे नोटीसमध्ये नमूद आहे. नगर भवनाच्या आतील जागेत आठवडी बाजार भरणार असून भिंतीसमोरच्या जागेत किरकोळ विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नगरभवन परिसरात पालिकेच्या वतीने मुरूम टाकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. येत्या पाच-सात दिवसात नगरभवनसमोरील व लगतचे अतिक्रमण पालिकेच्या वतीने हटविण्यात येणार आहे.