तीनच कर्मचाऱ्यांवर शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार

By admin | Published: November 18, 2014 10:54 PM2014-11-18T22:54:34+5:302014-11-18T22:54:34+5:30

शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

The weight of the electrical system in the city on three employees | तीनच कर्मचाऱ्यांवर शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार

तीनच कर्मचाऱ्यांवर शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार

Next

गडचिरोली : शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. शहरातील अनेक पथदिवे बंद असतांनाही कार्यालयामध्ये मात्र याबाबतची कोणतीही नोंद नाही.
गडचिरोली शहर दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. त्यानुसार नगर पालिका प्रशासन पथदिव्यांचा सुद्धा विस्तार करीत आहे. शहरात एकूण ३ हजार विद्युत खांब असून त्यांना जवळपास ३ हजार ५०० पथदिवे लावण्यात आले आहेत. यापूर्वी नगर परिषदेमध्ये पथदिव्यांची देखभाल करण्यासाठी सहा कर्मचारी कार्यरत होते. यातील तीन कर्मचारी नियमित तर तीन कर्मचारी रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आले होते. नियमित असलेले कर्मचारी विद्युतचे तज्ज्ञ होते. मात्र या तिनही कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांपूर्वी दुसऱ्या कार्यालयात बदली करण्यात आली. त्यामुळे या विभागाचा प्रभार नाईलाजास्तव मिळकत व्यवस्थापकाकडे सोपविण्यात आला. मात्र त्यांना विद्युत विभागाचा फारसा अनुभव नसल्याने विद्युत दिव्यांची देखभाल करतेवेळी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यांच्या दिमतीला दोन रोजंदारी कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र शहराचा व्याप व पथदिव्यांची संख्या लक्षात घेतली तर हा सर्व डोलारा या तीन कर्मचाऱ्यांना सांभाळतेवेळी बरीच कसरत करावी लागत आहे.
शहरातील ३ हजार ५०० विद्युत दिव्यांपैकी ५०० पेक्षा अधिक दिवे बंद स्थितीत आहेत. मात्र याबाबतची कोणतीही नोंद नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडे उपलब्ध नाही. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, रात्रीच्या सुमारास शहरात फिरून किती पथदिवे बंद आहेत, हे बघितले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या खांबाला दिवसा बल्ब लावल्या जातो, अशी माहिती दिली.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरमोरी मार्गावरील वनविभागाच्या नाक्यापासून ते कठाणी नदीपर्यंतचे संपूर्ण विद्युत दिवे मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत. मात्र सदर पथदिवे अजूनही दुरूस्त करण्यात आली नाही. त्याचबरोबर शहराच्या प्रत्येक वॉर्डातील अनेक दिवे बंद आहेत. याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
मुल मार्गावरील बहुतांश पथदिवे झाडांनी झाकली आहेत. त्यामुळे या दिव्यांचा प्रकाशच पडत नाही. वॉर्डातील बंद दिव्यांबाबत नागरिक या ठिकाणी तक्रार घेऊन येतात. मात्र सदर तक्रारीचे निराकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The weight of the electrical system in the city on three employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.