नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या सी-६० पथकाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:49 PM2017-12-08T22:49:18+5:302017-12-08T22:49:44+5:30
ज्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२ दिवसांपूर्वी धीरगंभीर वातावरणात पोलिसांच्या सी-६० पथकातील शहीद हवालदाराला अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच पोलीस मैदानावर गुरूवारी सायंकाळी सी-६० पथकाचा विजयी जल्लोष सुरू होता.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : ज्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२ दिवसांपूर्वी धीरगंभीर वातावरणात पोलिसांच्या सी-६० पथकातील शहीद हवालदाराला अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच पोलीस मैदानावर गुरूवारी सायंकाळी सी-६० पथकाचा विजयी जल्लोष सुरू होता. दिड आठवड्यापूर्वी आपल्यातीलच एका जवानाला हिरावून घेण्याचा जणू बदलाच घेतल्याचे समाधानी भाव पोलीस जवानांच्या आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर होते.
नक्षलविरोधी अभियानात बुधवारी (दि.६) झिंगानूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करून सात नक्षल्यांना कंठस्रान घालण्यात यश आले. एवढ्या संख्येने एकाचवेळी नक्षलवादी ठार होण्याची घटना पहिलीच असल्यामुळे साहजिक हे अभियान राबविणाºया सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह जवानांचा हुरूप वाढला. नक्षल्यांवर वरचढ होऊन मोहीम फत्ते करणाऱ्या सी-६० पथकाचे नेतृत्व करणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीराम मडावी व त्यांच्या संपूर्ण पथकाला गुरूवारी पोलीस मुख्यालयात बोलविण्यात आले.
सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हे पथक पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अ.पो.अधीक्षक महेंद्र पंडीत आदी प्रमुख अधिकाºयांसह मुख्यालयातील संपूर्ण पोलीस कर्मचारी जमले होते. महिला पोलीस आणि कुटुंबियांनी त्यांचे औक्षवण करून, फूल देऊन स्वागत केले. या पथकाच्या जयघोषणही करण्यात आला. अधिकाºयांनी त्यांना मिठाई भरविली. यावेळी आतिषकबाजी सोबतच बँडच्या तालावर कर्मचाºयांनी ताल धरला. त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून अधिकाऱ्यांचेही पाय थिरकले.