चकमकीत ठार झालेले दोघे नक्षलवादी नव्हते?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 05:52 AM2019-12-26T05:52:09+5:302019-12-26T05:52:39+5:30
आदिवासींचे निवेदन; पोलीस मात्र ठाम
भामरागड (गडचिरोली) : भामरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलालगत गेल्या ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्रान घातले, परंतु ते नक्षलवादी नव्हते तर शेतकरी होते, असा दावा करत नेलगुंडा परिसरातील शंभरावर नागरिकांनी धोडराज पोलीस मदत केंद्रात जाऊन तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र, पोलिसांनी नातेवाईकांचा हवाला देत ते दोघेही नक्षलवादीच होते असा दावा केला आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ठार झालेले प्रकाश चुक्कू मुहादा व राजू दस्सा पुसाली हे दोघेही नेलगुंडा येथील रहिवासी असून शेतकरी होते. गोरग्याचे झाड पाहण्यासाठी ते जंगलात गेले होते. तेथून परत येत असताना मोरोमेठ्ठा गावाजवळ पोलिसांनी त्यांना गाठून मारहाण करत नक्षलवाद्यांचा ठावठिकाणा सांगण्यास बजावले. भीतीमुळे दोघांनी ते ठिकाण दाखविले. तिथे नक्षलवादी आणि पोलिसांची चकमक उडाली. दुसºया दिवशी दोघांना नक्षलवादी ठरवत ठार मारण्यात आले. मंगळवारी रात्रीही निवेदन देण्यासाठी आलेले सर्व नागरिक पोलीस मदत केंद्रातच मुक्कामी होते. रात्र झाल्यामुळे त्यांनी मुक्काम केला असून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पोलीस विभागानेच केल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. बुधवारी सकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांनी धोडराज पोलीस मदत केंद्रात जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात काय सत्य आहे ते स्पष्ट होईलच
असे सांगून त्यांनी लोकांची समजूत काढली.
स्वार्थासाठी दिशाभूल
या प्रकरणी पोलिसांनी मृतांचे नातेवाईक आणि आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा हवाला देत ते मृत नक्षलवादीच होते, असा दावा केला आहे. नक्षलवादी आपल्या स्वार्थासाठी नागरिकांची दिशाभूल करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.