‘त्या’ रिकाम्या भूखंडांचे करणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:19 AM2021-09-02T05:19:49+5:302021-09-02T05:19:49+5:30
दुर्गम भागातील रानवाही मार्ग खड्ड्यात धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. ...
दुर्गम भागातील रानवाही मार्ग खड्ड्यात
धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
निराधारांचे अनुदान वाढवा
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
आराेग्य केंद्रात सेविकांची पदे रिक्त
गडचिरोली : जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करतात; मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दरहजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था कायमच
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करताना त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा हा मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव
धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसथांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून, येथे शेकडाे नागरिक दरराेज ये-जा करतात.