विकासाचे त्रिशूल म्हणणाऱ्यांनी गडचिरोलीसाठी काय केले, नितीन राऊत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:46 PM2023-08-19T13:46:13+5:302023-08-19T13:46:53+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी घेतला आढावा

What did those who called the trishul of development do for Gadchiroli - Nitin Raut | विकासाचे त्रिशूल म्हणणाऱ्यांनी गडचिरोलीसाठी काय केले, नितीन राऊत यांचा सवाल

विकासाचे त्रिशूल म्हणणाऱ्यांनी गडचिरोलीसाठी काय केले, नितीन राऊत यांचा सवाल

googlenewsNext

गडचिरोली : शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री गडचिरोलीत येऊन गेले. यावेळी त्यांनी विकासाचे त्रिशूल असल्याचा दावा केला; पण त्रिशूल म्हणणाऱ्यांसाठी जिल्ह्यासाठी आतापर्यंत काय केले, असा सवाल काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी निरीक्षक म्हणून वर्णी लागल्यानंतर डॉ. राऊत यांनी १८ ऑगस्टला प्रथमच शहरात येऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी मंत्री अविनाश वारजूरकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, हसनअली गिलानी उपस्थित होते.

यावेळी डॉ. नितीन राऊत म्हणाले, रोजगार, आरोग्य सुविधा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भारनियमनामुळे शेतकरी संकटात आहेत, दुर्गम भागात शाळांमध्ये शिक्षक नाहीत. मेडीगड्डा धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेती उद्ध्वस्त होत आहे, याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष असल्याची टीका त्यांनी केली. मणिपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतही महिला सुरक्षेकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची टिपण्णी त्यांनी केली.

शरद पवारांना पूर्ण सहकार्य

शरद पवार यांच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष असून त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे डॉ.नितीन राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर येथे म्हटले होते. त्यानंतर बीडच्या सभेत शरद पवार यांनी भाजपविरोधी भूमिका जाहीर केली, याविषयीच्या प्रश्नावर डॉ.नितीन राऊत यांनी शरद पवार हे भाजपविरोधी इंडिया घटक पक्षाचे प्रमुख नेते असून त्यांना काँग्रेस पूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

उमेदवार स्थानिकच पण...

काँग्रेस लोकसभेची उमेदवारी कोणाला देणार की बाहेरुन आयात करणार, या प्रश्नावर डॉ.राऊत यांनी उमेदवार स्थानिकच देऊ, असे स्पष्टीकरण दिले. मात्र, याबाबत नंतर तुम्हाला कळेलच असे सांगून त्यांनी भाष्य टाळले. कर्नाटकप्रमाणे राज्यातही मोट बांधू व जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: What did those who called the trishul of development do for Gadchiroli - Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.