माेबाईल बिघडला म्हणून काय झाले; आराेग्य बिघडायला नकाे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:44 AM2021-06-09T04:44:52+5:302021-06-09T04:44:52+5:30

गडचिराेली : सध्याच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात माेबाईल व स्माॅर्टफाेनला अतिशय महत्त्व आहे. माेबाईल नसले की, माणसाचे अनेक कामे ...

What happened as my mobile broke down; Don't let health get worse! | माेबाईल बिघडला म्हणून काय झाले; आराेग्य बिघडायला नकाे!

माेबाईल बिघडला म्हणून काय झाले; आराेग्य बिघडायला नकाे!

Next

गडचिराेली : सध्याच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात माेबाईल व स्माॅर्टफाेनला अतिशय महत्त्व आहे. माेबाईल नसले की, माणसाचे अनेक कामे रखडतात. संपर्क करण्याचे महत्त्वपूर्ण साधन असलेल्या माेबाईल खरेदी व दुरुस्तीचे दुकान लाॅकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून बंद हाेते. आता अनलाॅक झाल्यामुळे साेमवारी पहिल्या दिवशी माेबाईलच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून आली.

माेबाईल बिघडला असला तरी, आपले आराेग्य बिघडू नये, काेराेनाची बाधा हाेऊ नये, याकडे ग्राहकांसह दुकानदारांनीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. काेराेनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रशासनाने १३ एप्रिलपासून लाॅकडाऊन सुरू केले. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून तर ज्येष्ठांसाठी माेबाईल हाच एकमेव आधार ठरला हाेता. वर्क फ्रॉम हाेम, ऑनलाईन क्लासेस, नेट बॅंकिंगसाेबतच काेराेना रुग्णांची चाैकशी करण्यासाठी व्हिडिओ काॅलिंग आदींकरिता माेबाईलचा वापर माेठ्या प्रमाणात झाला. साेबतच काेविड लसीकरणासाठी नाेंदणीकरिता सर्वजण माेबाईलचा माेठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. लाॅकडाऊन कालावधीत माेबाईलचा वापर प्रचंड वाढल्याने अनेकांच्या माेबाईलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. काेराेनामुळे प्रसूती झालेल्या अनेक माता माहेरी अडकून पडल्या. आराेग्याच्या दृष्टिकाेनातून त्या तिकडेच थांबल्या. माेबाईल हाच आधार ठरला. व्हिडिओ काॅलिंगद्वारे संपर्कावर त्यांचा भर हाेता.

बाॅक्स ...

माेबाईल बिघाडाची कारणे

- माेबाईल स्क्रीनगार्ड खराब झाले, सततच्या वापरामुळे माेबाईलमध्ये बिघाड निर्माण झाले, आवाज न येणे किंवा जाणे, बॅटरी लवकर उतरणे, माेबाईल पडल्याने डिस्प्ले फुटल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडे दिसून आल्या. ऑटाेमॅटिक इतरांना फाेन लागणे, स्क्रीन टच काम न करणे आदी अनेक त्रुटी घेऊन बरेच ग्राहक माेबाईलच्या दुकानात आल्याचे दिसून आले.

- ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या हाती स्मार्ट फाेन दिला. शिक्षण घेता घेता मुले व मुली यांनी विविध प्रकारचे गेम व कार्टून पाहणे सुरू केले. त्यामुळे स्मार्ट फाेनमध्ये बिघाड निर्माण झाले.

बाॅक्स ....

सेल्समॅन व कारागिरांना मिळाले काम

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने माेबाईल दुकानातील सेल्समॅन व कारागीर दीड महिना बेराेजगार झाले हाेते. आता दुकाने सुरू झाल्याने पुन्हा त्यांना काम मिळाले. अनलाॅक हाेण्याची आम्ही प्रतीक्षा करीत हाेताे, असे त्यांनी सांगितले.

बाॅक्स .....

माेबाईल महत्त्वाचा पण आराेग्य?

२१ व्या शतकात माेबाईल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे. परंतु सततच्या वापरामुळे अनेकांच्या माेबाईलमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. साेमवारपासून माेबाईलसह सर्वच दुकाने सुरू झाली. दुपारी ४ पर्यंतची दुकानाची वेळ असल्याने अनेक ग्राहकांनी माेबाईल दुरुस्तीसाठी तसेच नवीन खरेदीसाठी गर्दी केली. माेबाईल महत्त्वाचा असला तरी आयुष्य त्यापेक्षा माैल्यवान आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

काेट .......

दीड महिन्यापासून शटर बंदच

मागील वर्षभरापासून काेराेनाचे संकट आहे. लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद असल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या हाेत्या. अनेक ग्राहकांनी माेबाईल दुरुस्तीसाठी फाेन केले. मात्र सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती रखडली हाेती. आता साेमवारपासून दुकाने सुरू झाल्याने आम्हा व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काेविडचे नियम पाळून आमच्या माेबाईल दुकानात खरेदी-विक्री व दुरुस्तीबाबतचे काम केले जात आहे.

- शहबाज खान पठाण, माेबाईल दुकानदार गडचिराेली

काेट .....

दुकाने सुरू झाल्याने दिलासा

गेल्या १५ दिवसांपासून माझ्या माेबाईलमध्ये स्क्रीनटचची समस्या निर्माण झाली. मात्र लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने माेबाईलची दुरुस्ती करता आली नाही. आता दुकाने सुरू झाल्याने माेबाईलचे दुकान गाठले.

- देव माेहुर्ले, ग्राहक

काेट .....

माझ्या माेबाईलमध्ये स्पीकरची समस्या निर्माण झाली. शिवाय काही तांत्रिक अडचणी हाेत्या. माझा स्मार्टफाेन याेग्य काम करीत नसल्याने अडचणी येत हाेत्या. शासनाने अनलाॅक केल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.

- शुभम शेरकी, ग्राहक

Web Title: What happened as my mobile broke down; Don't let health get worse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.