ही कसली नोकरी? १२ महिने २४ तास अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:19 PM2024-08-12T15:19:56+5:302024-08-12T15:20:49+5:30
Gadchiroli : अग्निशमन विभागावर पावसाळ्यातही कामांचा बोझा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अग्निशमन विभागाला वर्षातून अगदी मोजके दिवस काम करावे लागते. मात्र आगीची घटना कधी घडेल, हे सांगता येत नाही. त्यासाठी २४ तास अलर्ट राहावे लागते. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या दिवसांतही या विभागातील कर्मचाऱ्यांना अलर्ट ठेवले जाते.
पावसाळ्यात आगीच्या घटना फार कमी घडतात. त्यामुळे या विभागावर पावसाळ्यात इतर कामे सोपविली जातात. यामध्ये प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा समावेश होते. पावसाळ्याच्या दिवसांत झाडे पडून मार्ग बंद पडल्याच्या घटना घडतात. अशावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून ही समस्या दूर करावी लागते. केवळ एक चालक व एक फायरमन यांना अग्निशमनच्या कर्तव्यावर अलर्ट ठेवले जाते. इतर कर्मचारी इतर काम करीत असतात.
अग्निशमन विभाग करतोय ही सुद्धा कामे
- लाडक्या बहिणींना मदत : अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचारी आता लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरून देण्यास मदत करीत आहेत.
- आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी : पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीसुद्धा या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. पावसाळ्यात ही कामे केली जात आहेत.
- हेलिपॅडवर सेवा : पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर मंत्र्यांचे हेलिकॉप्टरने ये-जा सुरू असते. टेकऑफ व लॅन्डिंग करतेवेळी अग्निशमन वाहन तिथे ठेवले जाते.
- झाडे कटाईची कामे : पावसाळ्याच्या दिवसांत झाड पडून एखादा रोड बंद झाला असल्यास तेथील झाड उचलण्याची जबाबदारी अग्निशमन विभाग पार पाडते.
नऊ कर्मचाऱ्यांची फौज
एक सहाय्यक अग्निशमन अधिकारी, दोन चालक व सहा फायरमन अशी एकूण नऊ कर्मचाऱ्यांची फौज गडचिरोली येथे कार्यरत आहेत.
अग्निशमन विभागाने वर्षभरात १५ आगी विझवल्या
गडचिरोली अग्निशमन विभागाने वर्षभराच्या कालावधीत १५ आगी विझवल्या आहेत. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान टळले.
वर्षाचे १२ महिने २४ तास अलर्ट
वर्षाचे १२ महिने व २४ तास अलर्ट राहावे लागते. काम नाहीच्या बरोबर असले तरी रात्रंदिवस चालक व फायरमनची ड्युटी लावली जाते. आगीची घटना कधी घडेल हे सांगता येत नाही.
उन्हाळ्यात आगीच्या घटना जास्त
उन्हाळ्याच्या कालावधीत आग लागण्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात घडतात. त्यामुळे अलर्ट राहावे लागते.
संपूर्ण तालुक्याचा भार
गडचिरोली शहरातील अग्निशमन यंत्रणेवर संपूर्ण तालुक्याचा भार सोपविण्यात आला आहे. कधी-कधी धानोरा, चामोर्शी व आरमोरी तालुक्यातसुद्धा घटना घडतात. या तालुक्यातील आग विझवण्यासाठी गडचिरोली अग्निशमन दलाला जावे लागते, हे विशेष.
अग्निशमन विभागाला आग विझवण्यासोबतच इतर कामेसुद्धा करावी लागतात. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत आपत्ती व्यवस्थापनाची कामे करण्यात अग्निशमन विभागाचे अधिकारी व्यस्त आहेत.
- अनिल गोवर्धन, सहायक अग्निशमन अधिकारी