नवीन खरीप हंगामासाठी जि.प.चे नियोजन काय?
By admin | Published: May 19, 2017 12:19 AM2017-05-19T00:19:15+5:302017-05-19T00:19:15+5:30
जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला.
अडीच महिन्यांपासून बैठक नाही : पदाधिकारी कक्ष दुरूस्तीत व्यस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र अद्याप नवीन पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरूवात केलेली नाही. अडीच महिन्यांपासून सर्वसाधारण सभाही झालेली नाही. विशेष म्हणजे नवीन खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणतेही नियोजन केलेले नाही.
जिल्हा परिषदेत सध्या अनेक कामे ठप्प पडली आहेत. नवीन पदाधिकारी आपापल्या कक्षाचे नविनीकरण केल्याशिवाय कक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. काही दिवसातच शेतकऱ्यांना बियाण्यांची गरज पडणार आहे. वेळेवर बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. बेभाव बियाणे घ्यावे लागतात. त्यात फसगतही होते. पण जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने त्यादृष्टीने कोणतेही नियोजन केले नाही, असा आरोप वसा-पार्ला जि.प.क्षेत्राचे सदस्य आणि माजी कृषी सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी केला आहे.
पशुसंवर्धन विभागाचे गावागावत जाणारे फिरते वैद्यकीय पथक बंद झाले. पाऊस आल्यानंतर गुरांचे आजारही वाढतात. त्यामुळे त्यांना रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. मात्र त्याचे नियोजन नाही. अनेक लघु पाटबंधारे विभागाच्या तलावांचे व बंधाऱ्यांचे काम अर्धवट आहे. तलाव खोलीकरणासाठी देण्यात येणारा १५ ते २० लाखांचा निधी अपुरा आहे. त्यातून पुरेसे खोलीकरण होत नसल्याने पाण्याचा प्रत्यक्ष संग्रह होत नाही. हा निधी वाढवून द्यावा अशी मागणी बोरकुटे यांनी केली आहे. मुरूमासाठी अनेक नैसर्गिक पहाड खोदून काढले जातात. त्याऐवजी तलावांमधील मुरूमाची फुकट रॉयल्टी दिली असती तर तलाव खोलीकरणाचा खर्च वाचला असता आणि पहाडही वाचविता आले असते असे बोरकुटे लोकमतशी बोलताना म्हणाले.