यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 06:21 PM2023-02-08T18:21:40+5:302023-02-08T18:22:04+5:30
‘दंडकारण्य’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता
गडचिरोली : आज प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून शिकता येते. एवढेच नाही तर ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’मुळे स्वयंचलित कारपासून तर माणसांची अनेक कामेही यांत्रिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे भविष्यात अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या जातील. त्यामुळे जे काम यंत्रमानव करू शकणार नाही त्याबद्दलचे शिक्षण देण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी येथील विद्याभारती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना मांडले.
दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन मंगळवारी केले होते. यावेळी अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, सुप्रसिद्ध कादंबरीकार राजन गवस, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे होते.
यावेळी डॉ. बंग यांनी राजन गवस व रंगनाथ पठारे यांनी शिक्षण पद्धतीवर परखडपणे मांडलेल्या विचारांवर प्रकाश टाकताना आजचे शिक्षण विद्यार्थ्यांना कौशल्यापासून दूर नेणारे असल्याचे सांगितले. त्यामुळेच आजच्या मुलांना शेतीची कामेसुद्धा करता येत नाही. देशातील २५ कोटी लोक शिक्षणाच्या इंडस्ट्रीत व्यस्त आणि ग्रस्त असून त्यातून सुशिक्षित बेकारांचा केवळ फौजफाटा तयार होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रंगनाथ पठारे यांनी मातृभाषेपासून दूर नेऊन दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीवर टीका केली. परंतु गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गोविंदराव मुनघाटे यांनी सुरू केलेली शिक्षणाची परंपरा त्यांची पुढची पिढी चांगल्या पद्धतीने चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
स्वागतपर भाषण डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.
जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्याकडे तोंड करेल
यावेळी डॉ. बंग यांनी विनोबा भावेंनी सांगितलेले एक वाक्य लक्षात ठेवण्यास सांगितले. ‘जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्याकडे तोंड फिरवेल’ या वाक्याची फोड करताना ते म्हणाले, विकासाच्या रांगेत जगाच्या तुलनेत गडचिरोली शेवटच्या नंबरवर आहे. जग पुढे जात असताना तुमचा नंबर शेवटीच लागेल. त्यामुळे त्या रांगेत तुम्ही उलटे फिरा. मी तेच केले, विकसित देशात जाण्याची संधी सोडून मी गडचिरोलीत आलो म्हणूनच लोक मला मानतात, असे मर्मही त्यांनी उघड केले.
लौकिक वाढविणाऱ्यांचा सत्कार
- यावेळी दंडकारण्य शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणाऱ्या आणि शिक्षणात मौलिक योगदान देणाऱ्या शिक्षकवृंदांचा सत्कार करण्यात आला. त्यात दादाराव चौधरी, डॉ. अभय साळुंके, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, प्रतिभा रामटेके, चेतन गोरे, सतीश पवार, मधुकर बोबाटे, अशोक काचिनवार, मारुती कुरवडकर, पंढरी गुरनुले, राजू इंगोले, मनिष बेझलवार, भास्कर चौधरी, रमेश हलामी आणि प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांचा समावेश होता.
- यावेळी चांदाळा येथील आश्रमशाळा, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट या शाळांना उत्कृष्ट कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.