अहेरी जिल्हा केव्हा निर्माण होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:20 AM2018-12-10T00:20:37+5:302018-12-10T00:21:27+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्रातील लोकांसह राजकीय पुढाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी अहेरी विधानसभा क्षेत्रातील लोकांसह राजकीय पुढाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र ही मागणी अद्यापही शासनदरबारी धूळ खात पडली आहे. विद्यमान सरकारने अहेरी जिल्हा निर्मितीची अद्यापही घोषणा केली नाही. तशा सरकारकडून सकारात्मक हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे अहेरी जिल्हा निर्माण केव्हा होणार, असा सवाल अहेरी भागातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती, विविध सामाजिक संघटना व अनेक राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेकदा जिल्हाभर आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी उपोषण, धरणे आंदोलन करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र या आंदोलनाची दखल विद्यमान सरकारने अजुनही घेतली नाही. अहेरी जिल्हा निर्मितीच्या संदर्भात घडामोडी सुरू असल्या तरी विद्यमान सरकार अहेरी जिल्हा निर्मितीबाबत सकारात्मक आहे, अशी परिस्थिती आजपर्यंत निर्माण झाली नाही. असे असताना सुध्दा गेल्या अनेक वर्षांपासून अहेरी जिल्हा निर्मितीबाबतची चर्चा अहेरी व सिरोंचा परिसरात गेल्या अनेक दिवस सुरू होती. सन २०१७ च्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभपर्वावर शासनाकडून अहेरी जिल्हा निर्माण करून अहेरीसोबत राज्यातील अन्य काही जिल्हे निर्माण केले जाणार आहेत. अशी चर्चा संपूर्ण परिसरात सुरू होती. मात्र ही चर्चा अफवा ठरली. कारण त्यावेळी अहेरी जिल्हा निर्मितीसह कोणत्या जिल्हा निर्मितीची घोषणा करण्यात आली नाही. अहेरी जिल्हा निर्मिती करू, असे युती शासनाच्या पदाधिकाºयांनी निवडणुकीदरम्यानच्या जाहीरनाम्यात व प्रचारादरम्यान सांगितले होते. मात्र हे आश्वासन सत्ताधारी पदाधिकाºयांना पूर्ण करता आले नाही. अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास सिरोंचा तालुक्यातील जनतेला २१२ किमी अंतर गाठून गडचिरोली जिल्हा मुख्यालयी जावे लागणार नाही. वेळ व पैशाची बचत होईल. तसेच अहेरी जिल्ह्याची निर्मिती झाल्यास रेगुंठा, झिंगानूर, आसरअल्ली यासारख्या दुर्गम गावांना तालुक्याचा दर्जा प्राप्त होऊ शकतो.
तसेच रोजगाराची संधीही निर्माण होऊ शकते. विद्यमान सरकारने आता अहेरी जिल्हा निर्मितीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी अहेरी उपविभागातील हजारो नागरिकांनी केली आहे.