गतिरोधक केव्हा लावणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:46+5:302021-07-24T04:21:46+5:30
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून ...
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाहीत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयामार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने ही योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
शहरात डुकरांचा बंदोबस्त करा
आलापल्ली : आलापल्ली शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगरपंचायतीचे या डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी शहरातही गेल्या काही दिवसांपासून माेकाट डुकरे व जनावरांचा हैदाेस वाढला आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासन सुस्त आहे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा ही मागणी करण्यात आली. पंरतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही. स्वतंत्र इमारती बांधण्याची गरज आहे.
अनावश्यक फलकाने साैंदर्यीकरणात बाधा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात अनेक अनावश्यक बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणाला बाधा येत आहे. त्यामुळे हा फलक हटविण्याची मागणी आहे. बॅनर्समुळे चौकाच्या सौंदर्यीकरणात बाधा येत आहे.
घोट-रेखेगाव मार्ग उखडला
घोट : परिसरातील घोट-रेखेगाव मार्गाची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घोट हे मोठे गाव असल्याने या गावाला रेखेगाव येथील नागरिक विविध कामांसाठी येतात. हा मार्ग खराब असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधकाचा अभाव
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. बसस्थानकावर प्रवासी व विद्यार्थ्यांची नेहमीच गर्दी राहते. गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग कमी केला जात नाही.
जि. प. कॉलनीतील घरांची दुरुस्ती करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था आहे.
कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले,, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत.
कनेरी, नागेपल्ली दूध शीतकरण केंद्र बंदच
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात अपुरी अग्निशमन व्यवस्था
अहेरी : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १,६४८ गावे आहेत. घटनांच्यावेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे लक्ष देऊन नगरपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
खुल्या जागांची दुरवस्था कायम
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.