कृषी महाविद्यालय व रूग्णालय कधी सुरू होणार
By admin | Published: May 22, 2016 01:03 AM2016-05-22T01:03:37+5:302016-05-22T01:03:37+5:30
आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली शहरात
लोकप्रतिनिधींचे मौनच : सरकारकडून प्रतिसाद नाही
गडचिरोली : आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली शहरात शासकीय कृषी महाविद्यालयाची व महिला व बाल रूग्णालयाची प्रशस्त इमारत उभी करण्यात आली. मात्र या दोन्ही ठिकाणी अजुनपर्यंत कामकाज सुरू झालेले नाही. नवीन सरकार याबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधीही याबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याने या इमारती मागील दोन वर्षांपासून धूळखात पडून आहेत.
२०१० मध्ये गडचिरोली येथे नामदार पाटील यांनी स्वत: भूमिपूजन करून पाच कोटी रूपयातून कृषी महाविद्यालयाची इमारत सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरात उभी केली. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कृषी महाविद्यालय त्यांनीच आणले. वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत या इमारतीचे बांधकाम आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात पूर्ण करून घेतले. विद्यमान सरकारला या ठिकाणी अजुनही कृषी महाविद्यालय हलविता आलेले नाही. कृषी व संशोधन केंद्रातूनच कृषी महाविद्यालयाचा संसार सुरू आहे. अशीच परिस्थिती गडचिरोली शहरात निर्माण करण्यात आलेल्या महिला व बाल रूग्णालयाची आहे. एक स्वतंत्र मोठी इमारत आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली शहरात निर्माण झाली. नव्या सरकारला या रूग्णालयासाठी दीडशे पदांसाठीची पदमान्यता करून आणायची आहे. हे साधे व किरकोळ काम मागील दीड वर्षात भाजपच्या लोकप्रतिनिधींना करता आले नाही. मुख्यमंत्री विदर्भाचा असुनही साध्या दवाखाण्यासाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे इमारत कुलूपबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्हा सामान्य रूग्णालयात डॉक्टरांवर प्रचंड भार पडत आहे. अलिकडेच एक शिशू महिलेच्या पोटातच दगावल्याची घटना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे घडली. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी स्वतंत्र महिला रूग्णालय सुरू व्हावे, अशी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी सरकारला याबाबत का सांगत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)