पुलांची उंची वाढणार केव्हा?
By admin | Published: June 26, 2017 01:14 AM2017-06-26T01:14:43+5:302017-06-26T01:14:43+5:30
अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते.
दुर्लक्ष : गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील वाहतूक पावसाळ्यात बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक सलग आठवडाभर ठप्प असते. त्यामुळे तिन्ही नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी उपविभागातील सामाजिक संघटनांनी केली आहे.
गडअहेरी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने वारंवार पावसाळ्यात या भागाला फटका असत असतो. पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन संपर्क तुटत असतो. जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा या कालावधीत शेकडो गावांना होत नाही. तालुक्यातील शेकडो गावे पुरामुळे बाधित होतात. दिना नदीवरील पुलामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील वाहतुकीचे मार्ग बंद होत असतात. अशा स्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे दुर्गम भागात अनेक समस्या निर्माण होतात. या भागातील नागरिकांना या कमी उंचीच्या पुलामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. सदर तिन्ही पूल या भागातील विकासास अडसर ठरत आहे. पुलांची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी वारंवार अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. या संदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र शासनाने लक्ष दिले नाही. कमी उंचीच्या पुलामुळे उपविभागातील पाच तालुक्यांचा संपर्क पावसाळ्यात तुटत असतो. अनेकदा आठवडाभर गावांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे गडअहेरी, पर्लकोट, दिना नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.