गाभाऱ्याचे काम कधी पूर्ण होणार?
By admin | Published: June 5, 2017 12:45 AM2017-06-05T00:45:22+5:302017-06-05T00:45:22+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील देवस्थानच्या जीर्णाेद्धाराचे काम सतरा महिन्यांपासून रेंगाळले आहे.
दर्शनासाठी भाविकांना अडचण : पुरातत्त्व विभागाचा कानाडोळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील देवस्थानच्या जीर्णाेद्धाराचे काम सतरा महिन्यांपासून रेंगाळले आहे. त्यामुळे मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
भारतीय पुरातत्त्व विभाग नागपूर सर्कलने जानेवारी २०१६ मध्ये मंदिर जीर्णोद्धार कामाला सुरूवात केली. मार्र्कंडेश्वर मंदिराचा गाभारा खोलून ठेवला. जीर्णाेद्धाराचे काम दोन महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले. परंतु १७ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम रेंगाळलेलेच आहे. मार्र्कंडेश्वर मंदिराचे रेंगाळलेले काम होत नसल्याची दखल घेऊन मार्र्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी डिसेंबर २०१६ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच दिल्ली येथे त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यानंतरही काम सुरू झाले नाही. या संदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खा. अशोक नेते यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. सध्या मंदिराचा संपूर्ण कळस उकलून आहे. नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षिका नंदिनी शाहू यांच्या कार्यकाळात या कामाला सुरूवात झाली होती. परंतु काही कारणास्तव त्यांची बदली झाल्याने जीर्णोद्धाराच्या कामाची जबाबदारी रायपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेली. मात्र त्यानंतर कामाला संथगती आली. काम पुन्हा जोमाने सुरू व्हावे म्हणून डिसेंबर महिन्यात मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यांनासुद्धा या भेटीत प्रतिसाद मिळाला नाही. सध्या हे काम बंद आहे. मार्कंडादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनाही फॅक्सद्वारे काम तत्काळ पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली. परंतु अद्यापही कुठल्याही हालचाली दिसून येत नाही.
पुरातत्त्व विभागाविषयी जनाक्रोश- भडके
ऐतिहासिक वैैभवाची पार्श्वभूमी लाभलेल्या जागतिक कीर्तीचे वास्तूशिल्प मंदिर, दुर्ग, गड, किल्ले व अवशेषाच्या व संपूर्ण संरक्षणाची व देखरेखीची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथील जीर्णाेद्धाराचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलने जानेवारी २०१६ मध्ये सुरू केले. मंदिराचा गाभारा खोलून ठेवण्यात आला. परंतु १७ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. यंदाच्या महाशिवरात्रीला दर्शनाकरिता आलेल्या लाखो भाविकांना गाभाऱ्याचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाविषयी भाविकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन तत्काळ गाभाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी सेवानिवृत्त बीडीओ तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य काशिनाथ भडके यांनी केली आहे.