इथे केव्हा उजाडणार? सात गावांचा भार सांभाळतेय एक आरोग्यसेविका; गडचिरोलीतले वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:13 AM2021-06-10T11:13:57+5:302021-06-10T11:14:24+5:30
Gadchiroli News मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर सुरू असून, येथे स्थायी स्वरुपातील आरोग्य सेविकेचे पद भरण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन वर्षांपासून कंत्राटी आरोग्य सेविकेच्या भरवशावर सुरू असून, येथे स्थायी स्वरुपातील आरोग्य सेविकेचे पद भरण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्रात कोपरअल्ली (चेक), कोपरअल्ली (माल), अंबेला, लभानतांडा, विश्वनाथनगर, रेंगेवाही, लोहारा ही सात गावे येतात. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात स्थायी आरोग्यसेविका व कंत्राटी आरोग्यसेविका असते. मात्र, कोपरअल्ली येथील आरोग्य सेविकेचे पद ३ वर्षांपासून रिक्त आहे. प्रशासनाला याबाबत अनेकदा निवदने देऊनही आरोग्यसेविकेचे पद भरण्यात आले नाही.
एकट्या कंत्राटी आरोग्यसेविकेवर सात गावांचा भार असून, लसीकरण, कार्यालयीन मिटिंग, रुग्ण, प्रसुती अशी विविध कामे एकट्या आरोग्य सेविकेला पार पाडावी लागतात. त्यामुळे आरोग्य सेवेचा लाभ प्रत्येक रुग्णाला मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कोपरअली येथील आरोग्य उपकेंद्रात स्थायी आरोग्यसेविकेचे रिक्त पद तत्काळ भरावे, अशी मागणी होत आहे.