वीज समस्या सुटणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:12 PM2017-10-29T23:12:55+5:302017-10-29T23:13:13+5:30
तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात बाराही महिने वीज समस्या असते. या भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात बाराही महिने वीज समस्या असते. या भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो. गुड्डीगुडम व राजाराम परिसरात या समस्येचा सामना नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र याकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या भागाचा विकासही खुंटला आहे.
गुड्डीगुडम व राजाराम भागात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत समस्या या भागातील नागरिकांना भेडसावत आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधी या भागातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असून दिवसेंदिवस या समस्या वाढत चालल्यात आहेत. या भागातील समस्या अद्यापही न सुटल्याने दळणवळणाचीही समस्या निर्माण झाली आहे. गुड्डीगुडम व राजाराम परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु हा सर्व परिसर घनदाट जंगलाने व्यापला असल्याने कोणत्याही किरकोळ कारणानेही दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित राहतो. वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता, आलापल्ली, अहेरी येथून ये-जा करतात. त्यामुळे एकदा खंडित झालेला वीज पुरवठा दोन ते तीन दिवसापर्यंत सुरळीत होत नाही. अनेकदा चार ते आठ दिवस वीज पुरवठा खंडित असते. विजेसंबंधी कामे करण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील समस्या कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी विद्युत शाखा कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सर्वच नागरिकांनी ग्राम पंचायतीमार्फत ठराव पारीत करून जिमलगट्टा येथून आलेली वीज जोडणी नंदीगाव परिसरातून देण्याची मागणी केली होती. परंतु यावेळी अधिकाºयांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले, मात्र या समस्येकडे दुर्लक्ष झाले.
स्थायी लाईनमन नियुक्त करा
गुड्डीगुडम, राजाराम परिसरातील १५ ते २० गावे सांभाळण्याकरिता वीज वितरण विभागाच्या वतीने अत्यल्प कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यल्प कर्मचाºयांवरच संपूर्ण परिसराचा भार सांभाळला जात आहे. शिवाय मागील अनेक वर्षांपासून उर्वरित कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करण्याची मागणी होत आहे.