विधवांची कर्जमुक्ती केव्हा होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 03:19 PM2024-07-02T15:19:53+5:302024-07-02T15:21:29+5:30
Gadchiroli : कोरोना काळात पतीला गमावलेल्या महिलांना अद्यापही कर्जमाफी झालीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोविड-१९ मुळे विधवा झालेल्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले होते, पण त्याची पूर्तता हेळसांड झाली नाही. त्यामुळे विधवांची हेळसांड होत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.
कोविड-१९मुळे घरातील कर्ते पुरुष गेले. त्यामुळे त्यांच्या पश्चात पत्नीवर संसाराचे ओझे आले. ते पेलवताना त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा कोरोनात जीव गमावलेल्या पुरुषांच्याथकीत कर्जातून मुक्तता देण्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. या आदेशामुळे पती गमावलेल्या महिलांच्या कर्जमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, आता दीड वर्ष उलटूनसुद्धा विधवांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता हे कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न असल्याचे प्रा. येलेकर यांनी सांगितले.
महिलांची ससेहोलपट
कोरोनात पतीचे निधन झाल्यानंतर महिलेवर संपूर्ण कुटुंबियांची जबाबदारी येऊन पडली. शेती व्यवसाय व कुटुंबांचा गाडा चालविताना या विधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुलांचे शिक्षण, लग्नकार्य आदी प्रश्न आहेत.