गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क?

By दिलीप दहेलकर | Published: August 8, 2023 08:58 PM2023-08-08T20:58:36+5:302023-08-08T20:58:51+5:30

शासन, प्रशासन उदासीन : ग्रामस्थांची थेट उच्च न्यायालयात धाव

When will the first school in Gondi language get right to education? | गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क?

गाेंडी भाषेतील पहिल्या शाळेला कधी मिळणार शिक्षण हक्क?

googlenewsNext

गडचिराेली : धानाेरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील माेहगाव येथे ग्रामसभेच्या पुढाकारातून पारंपरिक काेया ज्ञानबाेध संस्कार गाेटूल निवासी शाळा म्हणून गेल्या चार वर्षांपासून गाेंडी भाषिक पहिली आदिवासी निवासी शाळा चालविली जात आहे. इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंत ७४ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेला अजूनही कायद्यान्वये शिक्षणाचा हक्क अर्थात मान्यता मिळालेली नाही. आरटीईसारखा कायदा लागू करताना दुसऱ्या बाजूला गोंडी भाषेतील शाळेच्या मान्यतेसाठी कागदी घोडे नाचविले जात आहेत.

यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने या शाळेला राज्य शासनाची मान्यता नाही त्यामुळे ही शाळा अनधिकृत आहे, अशी नाेटीस बजावून १ लाखाचा दंड शिक्षण समितीवर ठाेठावला. या विराेधात ग्रामसभा शिक्षण समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. यावर सुनावणी सुरू असून आदिवासी विकास विभाग, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याविरोधात ग्रामस्थांचा न्यायालयात लढा सुरू आहे. कोरोनाकाळात ही शाळा सुरू झाली असून अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

छत्तीसगडच्या शिक्षकांनी दिले प्रशिक्षण

गाेंडी भाषेत अध्ययन व अध्यापन कसे करावे, शिक्षणाचे धडे कसे द्यावे, यासाठीचे प्रशिक्षण देण्याकरिता छत्तीसगड राज्यातून तीन शिक्षक माेहगावात दाखल झाले. त्यांनी बी.ए., एम. ए. चे शिक्षण घेतलेल्या उच्च शिक्षित लाेकांना गाेंडी भाषेतील अध्यापनाचे प्रशिक्षण दिले. शाळा सुरू झाल्याच्या सहा महिन्यांनंतर ग्रामसभेने येथे इंग्रजी विषयासाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली.

चार भाषांसह अन्य विषयांचे अध्यापन
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिले जाते त्याच पद्धतीने सदर आदिवासी निवासी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. येथे गाेंडी भाषा, इंग्रजी, हिंदी, मराठी आदी चार भाषा असून इतर विषय आश्रमशाळा व शिक्षण विभागाप्रमाणे येथे शिकविले आहेत.

समितीमार्फत शाळेचे व्यवस्थापन
माेहगाव येथील ग्रामसभेमार्फत या शाळेचा कारभार चालविण्यासाठी ग्रामसभेच्या मान्यतेने ग्रामसभा शिक्षण समिती गठित करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून देवसाय आतला व सचिव म्हणून बावसू पावे काम पाहत आहेत. बिरसा मुंडा भात उत्पादक शेतकरी गटाची इमारत या शाळेसाठी माेफत देण्यात आली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या निधीतून टिन शेडच्या तीन वर्गखाेल्या तयार करण्यात आल्या आहेत. ७४ विद्यार्थी येथे निवासी राहून प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत.

तेंदू व्यवसायातून शाळेसाठी आर्थिक तरतूद व दातृत्व

माेहगाव परिसरातील १५ गावे मिळून तेंदू संकलन दरवर्षी केले जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी ५ टक्के रक्कम सदर निवासी शाळेसाठी तरतूद करून राखीव ठेवली जाते. शिवाय गावातील व परिसरातील ग्रामस्थ स्वत: साहित्यासाठी मदत करतात. ज्यांच्याकडे ज्या वस्तूंचे उत्पादन हाेते ती वस्तू शाळेला दान म्हणून देतात. कुणी धान्य, तांदूळ, कुणी डाळ तर कुणी भाजीपाला दान करतात. यातून शाळेतील मुलांसाठी भाेजनाची व्यवस्था केली जाते.

शासनाने माेहगाव ग्रामसभेला सदर निवासी शाळा चालविण्यासाठी मान्यता प्रदान करावी, आदिवासी संस्कृती, गाेंडी भाषा टिकविण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मिळून ही शाळा स्थापन केली आहे. शासनाने व प्रशासनाने सहकार्य करावे. ग्राममसभेला न्याय दिला पाहिजे. -बावसू पावे, सचिव शाळा शिक्षण समिती, माेहगाव

Web Title: When will the first school in Gondi language get right to education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.