खडतर प्रवास संपणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:31 PM2019-05-12T22:31:30+5:302019-05-12T22:31:54+5:30
तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे या मार्गावरील खडतर प्रवास संपणार कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत.
११ किमीचे अंतर असलेल्या या मार्गावरून पोर्लापासून वडधाकडे येत असताना सुरुवातीचा दोन किमीचा मार्ग आणि वडधाकडून पोर्लाकडे जात असताना दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र मध्यंतरी जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर अत्यंत खडतर आहे. या मार्गावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे कोणताही पुढाकार घेत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र रोष आहे.
या मार्गाची दरवर्षी प्रशासनाकडून थातूरमातूर डागडूजी करून वेळ निभावून नेली जाते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र उपाययोजना पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शासनाच्या निधीचा विल्हेवाट लावण्याचा प्रकार अवलंबिला जातो.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. या भागातील जनतेसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. खडतर मागार्मुळे अनेक चारचाकी वाहने भंगार होत आहेत. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, असे मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून दुचाकी चारचाकीसह मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जाते. यादृष्टीने सदर मार्ग मजबूत असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडे सदर समस्या मांडूनही ते या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जि.प. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
लोकप्रतिनिधींचेही आवागमन
वडधा परिसरात विविध कामानिमित्त अथवा दौºयानिमित्त बाहेरील लोकप्रतिनिधी याच मार्गाने येतात. शिवाय वडधा परिसरातील लोकप्रतिनिधी याच मार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना या रस्त्याची दुरवस्था दिसून येत नाही काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या नूतनीकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.