कुठे रावण दहन तर कुठे रावण पूजेने साजरा होणार दसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:28 AM2018-10-18T01:28:28+5:302018-10-18T11:17:42+5:30
चांगल्या व वाईट प्रवृत्तींना प्रतीकात्मक रूप, नामावली अथवा बिरूदावली लावून समाज पूजाअर्चा करीत असते. याला राजा रावणही अपवाद नाही. गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विजयादशमी उत्सव साजरा होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चांगल्या व वाईट प्रवृत्तींना प्रतीकात्मक रूप, नामावली अथवा बिरूदावली लावून समाज पूजाअर्चा करीत असते. याला राजा रावणही अपवाद नाही. गडचिरोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विजयादशमी उत्सव साजरा होतो. परंतु अनेक ठिकाणी रावण दहन तर कुठे महोत्सव आयोजित करून राजा रावणाची पूजा केली जाते. गुरूवार १८ आॅक्टोबरला होणाऱ्या विजयादशमीला अनेक ठिकाणी रावणाचे दहन तर काही ठिकाणी रावणाची पूजा होणार आहे.
जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण व अतिदुर्गम भागातही रावण दहन व रावणाची पूजा केली जाते. काही ठिकाणी सकाळच्या सुमारास रावणाची पूजा तर सायंकाळी रावणाचे दहन केले जाते. रामायण काळातील राजा रावण अनिष्ट प्रवृत्तीचे प्रतीक आहे, अशी मान्यता फार वर्षापासून आहे. परंतु यातही काळानुसार वैचारिकदृष्टी बदलत आहे. शहरी भागासह दुर्गम भागातही राजा रावणाबद्दल असलेला समज, गैरसमज सर्वसामान्य जनतेच्या बुद्धीला पटत आहे. राजा रावण अनिष्ट प्रवृत्तीचा होता, असा समज समाजातील बहुसंख्य वर्गात आहे. तर रावण आपला पूर्वज असून तो महाज्ञानी, प्रकांड पंडित, शूर, स्वाभिमानी राजा होता, असा धार्मिक भाव समाजातील एका वर्गात आहे. कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे मागील वर्षी राजा रावणाची प्रतिकृती लाकडावर कोरून ३० सप्टेंबरला प्रतिष्ठापणा करण्यात आली. येथील आदिवासी बांधवांमध्ये राजा रावणाविषयी अपार श्रद्धा व भक्तिभाव आहे. असे असले तरी विजयादशमीला सामाजिक शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये, म्हणून काही गावांत सकाळच्या सुमारास रावणाची पूजा एका वर्गाकडून केली जात तर सायंकाळी दुसºया समाजवर्गाकडून सायंकाळी रावण दहन सलोख्याने केले जाते. जिल्ह्यात अशा गावाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
२२ वर्षांपासून मालदुगीत रावण महोत्सव
कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे पहांदीपारी कुपारलिंगो गोंडीधर्म महासंघ ग्रामशाखेच्या वतीने महात्मा रावण महोत्सव गुरूवारी होणार आहे. महात्मा रावण हा मूलवंशी राजा होता. त्यामुळे देशातील मूलवंशीय महात्मा रावणाची पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करतात. रावण हा महान आयुर्वेद शास्त्रज्ञ, प्रजापती राजा, स्त्रियांचा आदर करणारा होता, असा भाव बहुसंख्य आदिवासी बांधवांमध्ये आहे. मागील २२ वर्षांपासून मालदुगी येथे दसºयाला रावणाची पूजा गोंडबांधव करतात. यंदा सकाळी शस्त्रपूजा त्यानंतर शोभायात्रा, ध्वजारोहण, दुपारी मार्गदर्शन, रात्री गोंडीनृत्य सादर होणार आहे. नृत्य स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल.
कमलापुरात रावण दहन व पूजा
अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव असलेल्या कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून रावण दहन केले जाते. सर्व जातीधर्मातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी होतात. परंतु मागील तीन वर्षांपासून आदिवासी समाज बांधवांनी रावण पूजेला सुरूवात केली. त्यामुळे सकाळी रावण पूजा तर संध्याकाळी रावण दहन केले जाते. रावण पूजा व रावण दहनाचे आयोजन वेगवेगळ्या समुदायाकडून व मंडळाकडून केले जात असतानाही गावात शांतता व सुव्यवस्था कायम असते. रावण पूजा आयोजक कोडसेलगुडम येथून कार्यक्रमस्थळी शोभायात्रा आणतात. तर रावण दहन आयोजक मंडळाची रॅली गावातील हनुमान मंदिरापासून समाज मंदिर कार्यक्रमस्थळी येत असते. दोन्ही कार्यक्रमात परिसरातील हजारो नागरिक सहभागी होत असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जातो.