नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनला पाणी देणार कुठून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:39 AM2021-03-23T04:39:07+5:302021-03-23T04:39:07+5:30

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन ...

Where will the new tap connection get water when there is no planning? | नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनला पाणी देणार कुठून?

नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनला पाणी देणार कुठून?

Next

कुरूड : देसाईगंज तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कुरूड व काेंढाळा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन नळ कनेक्शन दिले जाणार आहेत. दाेन्ही गावांत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. त्यातच आता पाणीपुरवठ्याबाबत कुठलेही नियाेजन न करता नवीन कनेक्शन दिले जाणार असल्याने गावात पाण्याची टंचाई निर्माण हाेऊन समस्या बिकट हाेण्याची शक्यता आहे. नियाेजन नसताना नवीन नळ कनेक्शनधारकांना पाणी देणार कुठून, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

कुरूड व काेंढाळा येथे वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वैनगंगा नदीवर दाेन्ही गावांसाठी स्वतंत्र विहिरींचे खाेदकाम केले आहे. दाेन्ही गावांत प्रत्येकी दाेन जलकुंभांतून पाणीपुरवठा केला जात आहे. कुरूड येथे ७७० नळ कनेक्शन आहेत तर जलजीवन याेजनेच्या नळ कनेक्शनसाठी नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काेंढाळा येथील लाेकसंख्या ३ हजार ८२६ आहे. गावात सध्या ५६० नळ कनेक्शनधारक आहेत तर नवीन कनेेक्शनसाठी आतापर्यंत ३९५ जणांनी अर्ज केले आहे. येथील पाणीपुरवठा याेजनेची जुनी टाकी ५० हजार लिटर क्षमतेची आहे तर नवीन टाकी पुन्हा तयार केली जात आहे. ग्रामपातळीवरील पाण्याची समस्या लक्षात न घेता व याेग्य नियोजन न करता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबांना नवीन नळ जोडणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उन्हाळा आला की प्रत्येक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. पाण्यासाठी महिला इकडे-तिकडे भटकंती करतात. नळाला आवश्यक प्रमाणात पाणी येत नाही. यामुळे हातपंप,सार्वजनिक विहिरींवर पाण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यातच नळजाेडणी नसणाऱ्यांना ग्रामपंचायत स्तरावर जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी दिली जात आहे. मात्र पाण्याचे नियोजनच नसल्याने केवळ नवीन नळ जोडणी देऊन त्याचा काय फायदा? असे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे.

बाॅक्स

... पिण्याच्या पाण्यासाठी हाेऊ शकते वणवण

कुरू व काेंढाळा येथे यापूर्वीच नळ योजनेच्या माध्यमातून भरपूर नळ जोडण्या देण्यात आल्या. याच नळ जोडणी धारकांना आवश्यक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ते त्रस्त आहेत. त्यातच पुन्हा पाणीपुरवठा योजनेचे नियोजन न करता नवीन जोडण्या देण्यात आल्या तर अगोदर ज्यांना पाणीपुरवठा व्हायचा त्यांनाही आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होणार नाही व नवीन जोडणीधारकही पाण्यासाठी वणवण फिरून ओरडल्याशिवाय राहणार नाही. नळ योजनेचा फज्जा होऊ नये यासाठी पाणीपुरवठा योजनेद्वारे योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

Web Title: Where will the new tap connection get water when there is no planning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.