अरेरे... 'आयुष्यमान' नाव रेखाटतानाच तुटली आयुष्याची दोरी; चित्रकाराचा मृत्यू
By संजय तिपाले | Published: December 29, 2023 02:11 PM2023-12-29T14:11:48+5:302023-12-29T14:12:39+5:30
बोटेकसाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना
गडचिरोली : नियतीचा खेळ कधी कुणाला कळलायं?, जीवन- मृत्यूचा सारा प्रवास अनिश्चित. कोरची तालुक्यात २८ डिसेंबरला एका घटनेने याची पुन्हा एकदा प्रचिती आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर 'आयुष्यमान' हे नाव रेखाटताना सज्जा तुटल्याने उंचावरुन कोसळल्याने चित्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनाला चटका लावणारी ही हृदयद्रावक घटना बोटेकसा येथे घडली.
सुरेश तुकाराम कराडे (वय ५५, रा. वॉर्ड क्र.७, कोरची) असे मयताचे नाव आहे. ते चित्रकार म्हणून तालुक्यात परिचित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रांना पूर्वी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र असे नाव होते ते बदलून आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर असे नामकरण करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानुसार, २८ डिसेंबर रोजी बोटेकसा येथे प्राथमिक आरोग्य इमारतीवर आयुष्यमान आरोग्य मंदिर हा नामफलक लावयचा होता. त्यासाठी चित्रकार सुरेश कराडे हे दोरीच्या सहाय्याने इमारतीच्या दर्शनी भागावरील सज्जावर पोहोचले व तेथे नाव रेखाटू लागले.
याचवेळी सज्जा तुटला व ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ.राहुल राऊत यांनी प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. शुक्रवारी सुरेश कराडे यांच्या मूळगावी कोचीनारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निकृष्ट बांधकाम, कंत्राटदारावर गुन्हा नोंदवावा
कोरचीपासून १२ किलोमीटरवरील बोटेकसा येथे २०१६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधली होती. या इमारतीच्या दर्शनी भागावरील सज्जा तुटल्याने चित्रकार सुरेश कराडे यांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कराडे यांच्या नातेवाईकांनी करणाऱ्या कंत्राटदारासह बांधकाम अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.