पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:16 AM2018-05-07T00:16:49+5:302018-05-07T00:16:49+5:30
तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पांढरसडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. गावातील लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठ्याची ही साधने कमी आहेत. त्यामुळे हातपंप खोदून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असली तरी जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे गावातील महिला व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावातील दोन्ही विहिरी एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच आटल्या. परिणामी गावातील महिलांची हातपंपावर गर्दी दिसून येते. हातपंपांना सुध्दा कमी प्रमाणात पाणी येत असल्याने हातपंपावर भांडे व महिलांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येते. पाणी भरण्यासाठी अर्धा तासानंतर नंबर लागत असल्याने कित्येक वेळ हातपंपावरच प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने पहाटेपासूनच गावातील विहिरींवर महिलांची गर्दी होते. सकाळीच विहिरीतील पाणी पूर्णपणे संपते. या गावात प्रत्येक कुटुंबांकडे जनावरे आहेत. बाहेरचे पाण्याचे स्त्रोत आटल्याने जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.
पाणी टंचाईबाबात खुटगाव ग्रामपंचायतीचे सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, विहिरीला दगड लागला आहे. त्यामुळे पुन्हा विहिरीचे खोलीकरण करणे शक्य नाही, अशी माहिती दिली.