दोन चकमकीतील ‘ते’ मृत नक्षलवादी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:59 PM2018-03-26T22:59:47+5:302018-03-26T22:59:47+5:30
एटापल्ली तालुक्यात १० जानेवारी आणि ५ फेब्रुवारीला झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीनंतर मृतावस्थेत आढळलेल्या दोन पुरूष नक्षलींची ओळख अद्याप पटलेली नाही.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात १० जानेवारी आणि ५ फेब्रुवारीला झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीनंतर मृतावस्थेत आढळलेल्या दोन पुरूष नक्षलींची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी सुरू असून त्याबाबत कोणाला काही सांगायचे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन एटापल्लीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे.
पोलीस मदत केंद्र, गट्टा (जां.) अंतर्गत कोर्इंदवर्षी ता.एटापल्ली जि.गडचिरोली जंगल परिसरात ५ फेब्रुवारीला पोलीस नक्षलवाद्यांत सशस्त्र चकमक झाली. त्यात शोध मोहिमेदरम्यान एका पुरु ष नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. मात्र त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
दुसºया घटनेत एटापल्ली पोलीस ठाण्यांतर्गत मौजा लांजी जंगल परिसरात १० जानेवारी २०१८ ला नक्षल अभियान राबवित असताना पोलीस व नक्षलवाद्यांत सशस्त्र चकमक झाली, त्यानंतर शोधमोहिमेदरम्यान एका पुरूष नक्षलवादीचा मृतदेह बंदुकीसह सापडला. या दोन्ही घटनेतील मृत नक्षल्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध लावण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये दंडाधिकारीय चौकशी केली जात आहे.
या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, या घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयीची माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन व शपथपत्रासह संपर्क करण्याचे आवाहन एटापल्लीचे उपविभागीय दंडाधिकारी एस.ए.थेटे यांनी केले आहे. अलिकडे पोलिसांनी नक्षल्यांविरूद्धचे अभियान तीव्र केले आहे. त्यातून काही नक्षल्यांना कंठस्नान घातले. अजून अनेक नक्षल्यांचा शोध पोलीस घेत आहेत.