धान घोटाळा करणाऱ्यांची पाठराखण करतंय कोण ? फौजदारीस चालढकल कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:39 IST2025-04-16T17:38:43+5:302025-04-16T17:39:19+5:30
चार कोटींचा गैरव्यवहार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही आदिवासी विकास महामंडळाला मिळेना मुहूर्त

Who is supporting the paddy scammers? Why is the criminal case being pushed?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव धान खरेदी केंद्रावर सन २०२३-२४ मध्ये दीड कोटी, तर २०२४-२५ मध्ये २ कोटी ४२ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात घोटाळेबाजांवर अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी २०२३-२४ मधील धान खरेदी प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देऊन १५ एप्रिलला आठ दिवस उलटले, त्यानंतर त्यांनी २०२४-२५ मधील गैरव्यवहार प्रकरणातही फौजदारी कारवाईचे फर्मान सोडले; पण आदिवासी विकास महामंडळाच्या सुस्त कारभारामुळे घोटाळेबाज मोकळेच आहेत. विशेष म्हणजे, गैरव्यवहाराचा आरोप असलेले उपप्रादेशिक व्यवस्थापक खुर्चीत कायम आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आदिवासी विविध कार्यकारी संस्था देऊळगाव खरेदी केंद्रावर २०२३-२४ हंगामात खरेदी करण्यात आलेले धान आणि बारदानात तफावत आढळून आली होती. यात एकूण १ कोटी ५३ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संस्थाध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक व संचालकांसह आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, २०२४-२५ मधील धान खरेदीची चौकशी समितीने पडताळणी केली असता २ कोटी ४२ लाख ७२ हजार ८८५ रुपयांचा गैरव्यवहार उजेडात आला.
पहिले प्रकरण उजेडात आल्यानंतर ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आठ दिवस उलटल्यानंतरही आदिवासी विकास महामंडळाने गुन्हा नोंदविलेला नाही. तथापि, २०२४-२५ मधील गैरव्यवहार प्रकरणातदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र फौजदारी कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे घोटाळेबाजांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या हालचाली
- जिल्हाधिकाऱ्यांनी १५ एप्रिलला प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांना पत्र लिहून २०२४-२५ मधील देऊळगाव केंद्रावरील गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
- शिवाय संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यासाठी व मालमत्तांचा लिलाव करून रक्कम शासन खात्यात जमा करण्याबाबत दोन दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले. फौजदारी कारवाईस विलंब होत असल्याने पुरावे नष्ट होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
गोठणगाव खरेदी केंद्रावरही ६४५ क्विंटल धानाची अफरातफर
- आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या खरेदी केंद्रावरील कथित थानघोटाळा गाजत असतानाच गोठणगाव येथेही २०२४-२५ मधील थानसाठ्यात तफावत आढळून आली आहे.
- गोठणगाव केंद्रावर एकूण १८ हजार ८२० क्विंटल धान खरेदी केली होती, शिल्लक धान १८ हजार २४३ क्विंटल असून, खरेदीपेक्षा ६४५.४५ क्विंटल धान कमी आढळून आले.
- देऊळगाव पॅटर्न गोठणगावातही अवलंबल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे लक्ष वेधले आहे. देऊळगाव, गोठणगाव येथील धान घोटाळ्यामुळे इतर केंद्रे संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत.
फौजदारी कारवाईऐवजी नोटीसचे सोपस्कार
या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी आदिवासी विकास महामंडळ कागदी घोडे नाचविण्यात रुची दाखवित असल्याचे दिसत आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून उपप्रादेशिक व्यवस्थापक यांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला जात आहे. चार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची व्याप्ती उपप्रादेशिक कार्यालयापर्यंत की नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालक कार्यालयापर्यंत, याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. मुरलीधर बावणे यांना कोण वाचवतंय, असा सवाल उपस्थित होत आहे.